माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचेकडून राष्ट्रपती सन्मानित श्रीमती मनीषा जाधव यांचे अभिनंदन
राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मु यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटएन्जील पुरस्काराने माळशिरस तालुक्यातील श्रीमती मनीषा भाऊसाहेब जाधव यांना केले सन्मानित.
माळशिरस तालुक्याच्या शिरपेचामध्ये श्रीमती मनीषा जाधव यांनी मानाचा तुरा रोवला, माळशिरस तालुक्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या परिवारामध्ये आनंदाला पारावर उरला नाही.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ए.एन.एम. पदावर कार्यरत असणाऱ्या श्रीमती मनीषा भाऊसो जाधव यांना आरोग्य सेवेतील त्यांच्या विशेष कार्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचे शुभहस्ते नॅशनल फ्लॉरेन्स नाईटएन्जील अवार्ड २०२१ या किताबाने दिल्ली राष्ट्रभवन येथे सन्मानित करण्यात आलेले आहे. माढा लोकसभा मतदार संघात माळशिरस तालुका येत असल्याने श्रीमती मनीषा जाधव यांच्या दैदीप्यमान कारकीर्दीचा गुणगौरव व मतदार संघातील अभिमानाची गोष्ट असल्याने श्रीमती मनीषा जाधव यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी केलेल्या कार्याला सलाम करून मनःपूर्वक अभिनंदन करून स्वतःच्या फेसबुकवर फोटोंसह प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
श्रीमती मनिषा भाऊसाहेब जाधव मागील १८ वर्षांपासून आरोग्य खात्यामध्ये आरोग्य परिचारिका म्हणून आरोग्यसेवा अविरतपणे निभावत आहेत. आज दि. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांना “राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटएन्जील पुरस्कार २०२१” या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने आपल्या देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचेहस्ते सन्मानित करण्यात आले. जाधव ह्या जिजाऊ ब्रिगेड सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
१२ मे १८१० हा फ्लॉरेन्स नाईटएन्जील यांचा जन्म दिवस. संपूर्ण आयुष्य त्यांनी आरोग्य-परिचारिका म्हणून आरोग्य सेवेत घालवले. त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये “जागतिक परिचर्या दिन ” म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून भारत सरकारद्वारे प्रत्येक वर्षी उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य परिचारिकेस “फ्लोरेन्स नाइटिंगेल” यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार बहाल केला जातो.
आरोग्यसेवेतील चांगले काम पाहून श्रीमती मनिषा भाऊसाहेब जाधव यांची नुकतीच देशपातळीवरील दिला जाणारा “नॅशनल फ्लॉरेन्स नाईटएन्जील पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवड झाली होती आणि आज हा पुरस्कार राष्ट्रपती यांचेहस्ते प्रदान करण्यात आला. यामध्ये सन्मानपत्र, मेडल आणि रोख रक्कम ५० हजार रुपये देवून गौरवण्यात आले. ग्रामीण भागातून शिक्षण घेवून आपल्या उत्कृष्ट कामातून राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र होणे, ही बाब खरं तर सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण प्रथमच आरोग्य विभागातून सोलापूर जिल्ह्यामधून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
श्रीमती मनीषा भाऊसाहेब जाधव यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण त्यांच्या गुरसाळे, ता. माळशिरस, जि. सोलापूर या जन्मगावी पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी कामा आणि अल्बलेस रुग्णालय मुंबई या ठिकाणावरून १८ महिन्याचे ANM चे प्रशिक्षण २००२ ला पूर्ण केले. त्यानंतर महानगरपालिका सोलापूर येथे आरोग्य विभागामध्ये २००३ ते २००४ दरम्यान आरोग्यसेविका या पदावरती काम केले. त्यानंतर २००५ दरम्यान त्यांची निवड जिल्हा परिषद सोलापूर यांचेकडून आरोग्यसेविका या पदासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र माणकी, ता. माळशिरस या ठिकाणी करण्यात आली. आणि आज त्या प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोची, उपकेंद्र धर्मपुरी जि. सोलापूर याठिकाणी कार्यरत आहेत. आरोग्यसेवेतील काम करत असताना त्यांनी स्वतःचे पुढील शिक्षण चालू ठेवले. आज त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढील पदवी नंतरचे शिक्षण चालू ठेवले आहे. त्याशिवाय कामा आणि अल्बालेस रुग्णालय मुंबई याठिकाणी २०१७ दरम्यान आरोग्य सेवेतील LHV चे ६ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्याठिकाणी ७ जिल्हयामधून प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाल्या.
त्याशिवाय त्या करत असलेल्या आरोग्यसेवेतील चांगल्या कामामुळे अनेक वेळा त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांना तालुका पातळीवरती २०१३ आणि २०१४ मध्ये “कुटुंब-नियोजन शस्त्रक्रिये” मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल सलग दोन्ही वर्षे “प्रथम क्रमांक” मिळाल्याचे प्रमाणपत्र त्यावेळेचे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम कासार यांचे हस्ते देण्यात आले होते. त्यांनी २०१७ मध्ये “जननी-सुरक्षा योजना” शस्त्रक्रियेमध्ये उत्कृष्ट काम केल्याने तालुका पातळीवरती त्या करत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रथम क्रमांक आला होता. त्यासाठीचा पुरस्कार त्यावेळेचे सोलापूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधीकारी श्री. राजेंद्र भारूड यांचे हस्ते प्रदान करण्यात आला होता. त्याशिवाय १२ मे २०१८ रोजी उत्कृष्ट कामाबद्दल “कामा आणि अल्ब्लेस रुग्णालय मुंबई” यांचे तर्फे दिला जाणारा “आदर्श परिचारिका” हा पुरस्कार देण्यात आला होता. १५ ऑगस्ट २०२० रोजी त्या करत असलेल्या कामाच्या ठिकाणी “ग्रामपंचायत धर्मपुरी” यांचे वतीने झेंडा वंदनाचा मान देऊन कोरोना काळात केलेल्या चांगल्या कामाचा सन्मान केला गेला. कोरोना काळामध्ये एका दिवशी ४३२ कोरोना टेस्ट आणि तीन दिवसामध्ये ११०० कोरोना टेस्ट केल्या गेल्या होत्या. त्याबद्दल “प्राथमिक आरोग्य अधिकारी” मोरोची चे वैदयकिय अधिकारी डॉ. मेहता साहेब यांचेकडून चांगल्या कामाची प्रशंसा केली गेली होती. त्याशिवाय त्या अनेक सामजिक कार्यात भाग घेत असतात.
दरवर्षी १ मे रोजी चे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्या अनेक सामाजिक संस्थांना काही ना काही मदत करत असतात. ज्यामध्ये गरजू, गोरगरीब, अंध-अपंग शाळा, सामाजिक, शैक्षणिक संस्थांना वस्तू रूपाने अथवा आर्थिक मदत करत असतात. त्यांचे पती कै. भाऊसाहेब जाधव यांनी देशाच्या सीमेवरती आर्मीमध्ये सेवा केली होती. त्याशिवाय त्यांचा कारगिल युद्धामध्येही सहभाग होता. आपल्या मुलानेही देश सेवा करावी, यासाठी त्याची डिफेन्समध्ये निवड होण्यासाठी प्रयत्न करत होत्या. नुकतीच त्यांचा मुलगा साहिल भाऊसाहेब जाधव याची वयाच्या १९ व्या वर्षी डिफेन्स मधील SSB (TES ) कोर्स – ४७ batch मधील Interview मध्ये निवड झाली आहे. जो आशिया खंडातील सर्वात अवघड interview समजला जातो आणि आज त्यांचा मुलगा भारतीय सेनेमध्ये लेफ्टनंट या पदावरती बिहार मधील OTA GAYA या ठिकाणी पुढील प्रशिक्षण घेत आहे.
तरी आरोग्यसेवेतील उत्कृष्ट कामासाठी देशभरातून प्रत्येक राज्यांमधून या पुरस्कारासाठी वेगवेगळ्या पदावरील ५१ पुरस्कारविजेते निवड करत असताना आपल्या महाराष्ट्र राज्यातून ANM म्हणुन श्रीमती मनीषा भाऊसाहेब जाधव यांची निवड करण्यात आल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा…
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng