महाळुंग सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर यांचे हृदयविकाराने पुण्यात दुःखद निधन.

महाळुंग पंचक्रोशीतील सोज्वळ, प्रामाणिक, मनमिळावू नेतृत्वाचा अंत सर्वसामान्य व गोरगरीब जनतेत हळहळ…
महाळुंग (बारामती झटका)
महाळुंग, ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार महाळुंग विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र उर्फ बंडू वसंत वाळेकर यांचे 52 व्या वर्षी आज शुक्रवार दि. 5/12/2025 रोजी सकाळी पुणे येथे उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. महाळुंग पंचक्रोशीतील सोज्वळ, प्रामाणिक, मनमिळावू नेतृत्वाचा अंत झाल्याने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रविवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. तत्काळ त्यांना अकलूज मधील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर करून पुणे येथे बायपास सर्जरीसाठी सुप्रसिद्ध हृदय शस्त्रक्रिया करणारे डॉ. रणजीत जगताप यांच्या हॉस्पिटल मध्ये ॲडमिट करण्यात आले होते. ऑपरेशन पूर्वी प्रकृतीत सुधारणा न झाल्याने उपचारादरम्यान आयसीयू मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांचे बंधू आणि परिसरातील सुप्रसिद्ध डॉ. संजय वाळेकर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. बंडू वाळेकर हे स्वर्गीय कुंडलिकभाऊ रेडे यांच्या राजकीय विचारांचे समर्थक आणि त्यांच्या स्थानिक पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जात होते.
राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर हे सामाजिक, राजकीय आणि सहकारी क्षेत्रात सक्रिय होते. मनमिळावू स्वभाव, सर्वांशी जिव्हाळा, आणि गावातील प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होणारे म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने परिसरातील लोकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ते परिसरात भाऊसाहेब या नावाने देखील प्रसिद्ध होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बंधू-भावजय, पुतणे असे कुटुंबीय आहेत.

परिसरातील सर्व समाजघटक, मित्रपरिवार, सहकारी आणि नागरिकांनी त्यांच्या आठवणी जागवून शोक व्यक्त केला आहे.
त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवार दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता महाळुंग-रेडे वस्ती येथे होणार आहे.
वाळेकर परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण श्रद्धांजली आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



