माळशिरस तालुक्यात माऊलींच्या पालखीच्या आगमनावेळी वरूण राजाची दमदार हजेरी..
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आगमनादिवशी व श्री संत तुकाराम महाराज यांच्या आगमनाच्या पूर्व संध्येला पावसाची हजेरी लागलेली आहे.
माळशिरस तालुक्यात माऊलींच्या पालखीचे पुरंदावडे येथे तर तुकोबारायांच्या पालखीचे अकलूज येथे पहिले गोल रिंगण संपन्न होत आहे, वरूण राजाने हजेरी लावून वैष्णव वारकरी व भाविकांना चिंब भिजवावे..
माळशिरस (बारामती झटका)
कैवल्य साम्राज्य संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात धर्मपुरी येथे आज आगमन झालेले आहे. उद्या संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे अकलूज येथे आगमन होणार आहे. माऊलींच्या आगमनादिवशी व तुकोबारायांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला वरूण राजाने हजेरी लावलेली आहे. माळशिरस तालुक्यात माऊलींच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण पुरंदावडे येथे व तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण अकलूज येथे संपन्न होत असल्याने वरूण राजाने रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी हजेरी लावून वैष्णव वारकरी व भाविकांना चिंब भिजवावे, अशी भाविकभक्तांची अपेक्षा आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आळंदी व श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहू येथून निघालेला आहे. पालखी सुरुवात झाल्यापासून दोन्हीही पालखी रस्त्यावर विसावा अथवा मुक्कामाच्या ठिकाणी वरूण राजाची अद्यापपर्यंत हजेरी लागलेली नाही. सध्या उन्हाचा तडाखा वाढलेला असल्याने वैष्णव वारकरी व भाविकभक्तांना उन्हाचे चटके बसत आहेत. तरीसुद्धा आनंदाने मजल दर मजल करीत पांडुरंगाच्या भेटीकडे वाटचाल सुरू आहे. अनेक ठिकाणी मंडप शेड मारून वारकऱ्यांना उन्हापासून संरक्षण केले जात आहे. कितीतरी वारकरी व भाविकभक्त रस्त्याच्या कडेला झाडाझुडपामध्ये बसून उन्हापासून संरक्षण करीत आहेत.
पालखी सोहळ्यामध्ये वरूण राजाने हजेरी लावल्यानंतर वातावरण आल्हाददायक होत असते. आज माळशिरस तालुक्याच्या पूर्व दक्षिण भागामध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. माऊलींच्या व तुकोबारायांच्या रिंगण सोहळ्यास वरूण राजाची हजेरी लागून वैष्णव वारकरी यांना चिंब भिजवून आनंद द्विगुणीत करावा, अशी भाविक भक्तांची अपेक्षा आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng