छत्रपती राजर्षी शाहू महाराज सांस्कृतिक मराठा भवन या वास्तूचे भुमिपुजन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याहस्ते संपन्न होणार – सकल मराठा समाज

पंढरपूर (बारामती झटका)
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची परंपरा आहे कि, आषाढी एकादशीच्या महापुजेला राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते व कार्तिकी एकादशीला राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पूजा संपन्न होत असते. यावर्षीही आषाढी एकादशीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते महापूजा करण्यात येणार आहे. मागच्या कार्तिकी एकादशीला मराठा समाजाने काही मागण्या करत उपमुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी येऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. तथापि आपल्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते पंढरपूरची कार्तिकी एकादशीची महापूजा व्हावी, असा प्रयत्न झाला व आपल्या इच्छेप्रमाणे पंढरपुरातील सर्व सकल मराठा समाजाच्या बांधवांनी एकत्र येऊन सदरची वारीची महापूजा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.

त्यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मराठा समाजातील शिष्टमंडळाचे बोलणे झाल्याप्रमाणे मराठा समाजाच्या मागण्यासाठी पंढरपूर शहरातील जागा व भवन बांधण्यासाठी निधीसाठी तरतूद करून ही मागणी केल्याप्रमाणे संत गजानन महाराज मठाशेजारी गट नंबर १४२ ही जागा मराठा समाज भवनासाठी घेण्याचे ठरले. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांनी पाच कोटी पाच लाख रुपयांची मान्यता दिली. आणि निधी उपलब्ध करून दिला आहे.
येत्या 17 तारखेला पंढरपूर येथे आषाढी यात्रा आहे. परंपरेप्रमाणे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणजेच आपण महापुजेसाठी सलग दुसऱ्याही वर्षी येणार आहात. त्यावेळी छत्रपती राजश्री शाहू महाराज सांस्कृतिक भवन व मराठा भवन, पंढरपूर या वास्तूचे भूमिपूजन सकल मराठा समाजाच्या विनंतीला मान देऊन आपण आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून आपल्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. यासाठी पंढरपूर शहरातील व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आपणास आमंत्रित करण्यात येत आहे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना पंढरपूर येथील सकल मराठा समाजाचे जेष्ठ व पंढरपूर नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष किरण आप्पा भोसले, सामाजिक संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष दिपक दादा वाडदेकर, शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील, समाजसेवक संतोष कवडे, शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे, महाराष्ट्र प्रदेश सचिव शंकर सुरवसे, छावा संघटनेचे भास्कर तात्या जगताप, हर्षद भागे आदी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील यांनी दिली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.