माळशिरस पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून “आरोग्य संजीवनी अभियानाचे” आयोजन

एकाच दिवशी ५ हजार कर्मचारी, स्वयंसेवक करणार ५ लाख लोकसंख्येसाठी आजाराचे प्रतिबंध व जनजागरण
माळशिरस (बारामती झटका)
सध्या पावसाळ्याचे दिवस असून सदरच्या कालावधीमध्ये दूषित पाण्यापासून तसेच डास व कीटक चावल्यामुळे विविध आजाराची लागण होऊ शकते. सध्या लहान मुलांमध्ये डोळे येण्याच्या साथीची लागण झाल्याच्या घटना पण घडत आहेत. सदर आजाराची लागण होऊ नये यासाठी प्रतिबंध व जनजागृतीची गरज असल्याने सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे मॅडम, पुणे मंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने सर्व विभागाच्या समन्वयाने विशेष “आरोग्य संजीवनी अभियान” आयोजित केले आहे.
सदर अभियान दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी तालुक्यात सर्वत्र एकाच वेळेस राबविण्यात येणार असून यामध्ये सर्व पदाधिकारी, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग, नगरपरिषद व नगरपंचायती, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण विभाग, बचत गट, विविध सेवाभावी संघटना सहभागी होणार आहेत. यामध्ये अंदाजे सर्व मिळून ५ हजार कर्मचारी व स्वयंसेवक ५ लाख लोकसंख्येसाठी प्रतिबंध आणि जनजागृतीचे कामकाज करणार आहेत.

डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजाराचे डास विशेषतः घरातील स्वच्छ पाण्यात वाढतात. त्यामुळे कंटेनर सर्वेक्षण, कोरडा दिवस जनजागरण, शालेय विद्यार्थ्यामार्फत जनजागरण, घराशेजारी साठलेल्या पाण्याची विल्हेवाट, पाणी शुद्धीकरण इत्यादी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. आरोग्य विभागामार्फत विशेष बैठक घेऊन या अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे.

पावसाळ्यात होणारे जलजन्य आणि कीटकजन्य आजार तसेच सध्या ऐकिवात असलेली डोळे येण्याची साथ टाळण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय योजना करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
1) पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा.
2) शेतात घरचे शुद्ध पाणी सोबत घेऊन जावे.
3)) शेतातील नाले, ओढ्याचे, विहीरीचे पाणी पिऊ नये.
4) आपल्या घराच्या आजु बाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा.
5) उघड्यावर शौचास बसु नये व लहान मुलांनापण बसवु नये. शौचालयाचा वापर करावा.
6) परिसरातील नाल्या, गटारी, डबकी साचु नये याबाबत दक्ष राहावे. साठलेल्या पाण्यात खराब झालेले ऑइल टाकावे.
7) डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजाराचे डास घरातील कुलरमधील व फ्रिजमधील पाणी, फुलदाणी मधील पाणी, घर व परिसरात पडलेले अडगळीचे सामान जसेकी टायर, टाकाऊ भांडी, नारळाच्या करवंट्या यामध्ये पाणी साठते. हे टाळण्यासाठी या सर्व गोष्टी नष्ट कराव्यात. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी सर्व पाण्याची भांडी आठवड़यातुन एकदा रिकामी करून धुवून पुसून कोरडी करून परत भरावीत.
8) सांडपाणीसाठी शोषखड़ा व् परसबाग निर्माण करावी.
9) उघड़यावरचे अन्न व शिळे अन्न सेवन करू नये.
10) डोळे लाल होत असतील, चिकट होत असतील, डोळ्यातून स्त्राव येत असेल तर डोळे आल्याची शक्यता असते. अशा व्यक्तीने डोळे व हात स्वच्छ पाण्याने धुवावेत, इतर व्यक्तीने वापरलेले टॉवेल, रुमाल इत्यादी डोळे पुसण्यासाठी वापरू नये. डोळे चोळू नयेत. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विद्यार्थ्यांचे डोळे आल्यास त्यांना शाळेत पाठवू नये.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng