माळशिरस पोलीस स्टेशन येथे सक्षम पोलीस निरीक्षक यांची नेमणूक करावी, जनतेची मागणी.
माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी वाढ व अवैधधंद्याने डोके वर काढले…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होत आहे व हद्दीत अवैधधंद्याने डोके वर काढले असल्याने सर्वसामान्य जनता, नागरिक, महिला आणि विद्यार्थी त्रस्त झालेले आहेत. माळशिरस पोलीस स्टेशन येथे सक्षम पोलीस निरीक्षक यांची नेमणूक करावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.
माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक गावांचा समावेश होत आहे. माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण आहे. आसपासच्या गावातील अनेक लोकांचा दैनंदिन, शिक्षण, दवाखाना, न्यायालय व शासकीय कार्यालयात कामानिमित्त संबंध येत असतो. आठवडा बाजार असतो. तालुक्यामध्ये माळशिरस पोलीस स्टेशन महत्त्वाचे आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरता व गुन्हेगारी आटोक्यात राहण्याकरता अवैध व्यवसाय व धंदे बंद होणे गरजेचे आहे. परंतु, अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी वाढ व अवैध धंद्याने डोके वर काढलेले आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम व अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्याकडे पदभार असताना महत्त्वाच्या पोलीस स्टेशनकडे कायम लक्ष होते. त्यामुळे अवैध व्यावसायिक यांच्यावर धाक होता. तेजस्वी सातपुते मॅडम यांनी भरारी पथकांची नेमणूक करून अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा, मटका, जुगार, गुटखा यांच्यावर गुन्हे दाखल करून अवैध व्यवसाय साखळी खिळखिळी केलेली होती. तेजस्वी सातपुते मॅडम व डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या बदली होऊन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अकलूज उपविभागीय अधिकारी सई भोर पाटील यांच्याकडे पदभार आलेला आहे. पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे अवैध व्यवसायिक व पोलीस प्रशासन यांच्यावर नियंत्रण ठेवले होते तसे नियंत्रण वाटत नसल्याचे जनतेमधून बोलले जात आहे.
गुरुवारी आठवडा बाजारी काही लोकांशी कायदा व सुव्यवस्था याविषयी संवाद साधला असता जनतेकडून नाराजीचा सूर उमटलेला होता. काही दिवसांवर गणपती, नवरात्र उत्सव व सण समारंभ असतात. अशावेळी माळशिरस पोलीस स्टेशन येथे सक्षम अधिकारी असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng