Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस येथील प्रसिद्ध पानाडी तुकाराम निवृत्ती मस्के यांचे अपघाती दुःखद निधन…

माळशिरस ( बारामती झटका)

माळशिरस येथील सुप्रसिद्ध पानाडी तुकाराम निवृत्ती मस्के यांचे शुक्रवार दिनांक 05 मे 2023 रोजी वयाच्या 76 व्या वर्षी अपघाती दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे.

तुकाराम निवृत्ती मस्के यांचे अपघाती निधन झाल्यामुळे मस्के परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा जन्म 1947 साली अतिशय गरीब शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला होता. जिद्दीने व कष्टाने परिस्थितीवर मात करायची या उद्देशाने शेतामध्ये काबाडकष्ट करून भरघोस उसाचे उत्पन्न घेऊन 1992 साली श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर यांचेकडुन प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी उसाच्या 7219 या उसाच्या जातीमध्ये उत्पन्न काढलेले होते. उसाच्या शेतीबरोबर बोर, द्राक्ष अशा फळबागांमध्येही चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत होते.

2000 सालापासून त्यांनी पाणी बघण्याचे काम सुरू केलेले होते. त्यांना दादा पानाडी या टोपण नावाने सर्वजण ओळखत होते. सोलापूर व पुणे जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना त्यांनी पाणी दाखवून त्यांची शेती हिरवीगार केलेली होती. पाच मे रोजी सकाळी 09.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचा अपघात टेंभुर्णी जवळ सापटणे या गावी पाणी बघून माघारी येत असताना चौकामध्ये झाला. त्यांना अज्ञात टू व्हीलर ने धडक दिली त्यामध्ये त्यांचे दुर्दैवी दुःखद निधन झालेले आहे. त्यांची तीन मुले त्यापैकी संजय मस्के शेती व्यवसाय करतात, कैलास मस्के फळ विक्रीचा व्यवसाय करतात, तर विलास मस्के गोपाळराव देव प्रशाला माळशिरस या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मस्के परिवार सुसंस्कृत व धार्मिक आहे.

ते दरवर्षी आळंदी ते पंढरपूर वारी करत असत. यावर्षी सुद्धा दिंडीमध्ये पायी वारी करण्याकरता नाव नोंदणी केलेली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी देवाचे भक्त होते. त्यांच्या आकस्मित जाण्याने मस्के परिवाराच्या मनाला चटका लागला आहे. त्यांच्या रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम रविवार दि. 07/05/2023 रोजी सकाळी 7 वाजता राहत्या घराशेजारी शेतामध्ये दहन दिलेल्या ठिकाणी होणार आहे.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button