माळशिरस येथे रात्रभर चोर-पोलिसांचा सिनेस्टाईल पद्धतीने रंगला खेळ
माळशिरस (बारामती झटका)
करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील एटीएम फोडून रोख रकमेची चोरी करणारे अज्ञात चोरटे हरयाणा पासिंग असलेली इर्टिगा गाडी (एचआर ५१ बीवाय ४०९६) मधून फरार झाले होते. ते फलटणहून पंढरपूरच्या दिशेने येत असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण नियंत्रण कक्ष यांना मिळाली होती. माळशिरस पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी माळशिरस शहरालगत ज्या ठिकाणाहून बायपास सुरू होतो त्या ठिकाणावरील यादव पेट्रोल पंपा समोर नाकाबंदी लावली होती.
रात्री साडेअकराच्या सुमारास फलटणहून एक गाडी येऊन नाकाबंदी पासून 30 मीटर अंतरावर थांबली. संशयास्पद वाहन माघारी फिरल्याने पोलिसांनी पाठलाग करून वाहन गाठले. वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत चोरट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली. त्यानंतर पहाटे दुसऱ्या ठिकाणी त्यातील एकाला पकडताना बॅग हाती लागली. मात्र, चोरट्यांना पळून जाण्यात यश मिळाले. पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन घोळकर, मायाप्पा पुजारी फौजफाट्यासह पोलीस यंत्रणा सज्ज होती.
गाडीने घेतला युटर्न अन् पोलीस यंत्रणा हल्ली
नाकाबंदी पाहून ३० मीटर वरून गाडीने युटर्न घेतल्याने पोलिसांनी या गाडीचा पाठलाग सुरू करत येळीव हद्दीत रात्री उशिरा कार ताब्यात घेतली. त्यानंतर माळशिरस हद्दीत पुन्हा संशयित आढळल्याने पोलिसांची झटापट झाली. यात त्यांची बॅग पोलिसांच्या ताब्यात आली. पोलीस अधिकारी हिम्मतराव जाधव, विभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रुपेश झेंडे, सुनील मारकड, संतोष घोगरे, कुमार गोडसे, शिवाजी परांडे, बापू कोकाटे या पोलीस पथकासह भेटी देऊन मार्गदर्शन केले.
दरम्यान, माळशिरस पोलिसांनी सर्व ग्रामस्थांनी सावध राहावे. काही निदर्शनास आल्यास एकमेकांना मेसेज करावा व माळशिरस पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng