माळीनगर येथे तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात
माळीनगर (बारामती झटका)
नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे दान रे |
फक्त भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे ||
कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू |
ढगाला थोडे हलवून भिजव माझे गांव तू ||
मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान |
यावर्षी भरपूर पिकू दे माझ्या शेतकऱ्याचे रान ||
या अभंगाप्रमाणे पंढरपुरीच्या सावळ्याच्या भेटीची आस लागलेल्या व पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो वैष्णवांच्या भक्ती कल्लोळात विठूनामाच्या भक्तीरसात, तल्लीन होऊन पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्यातील लाखो वैष्णवांचे व पालखी सोहळ्याचे माळीनगर येथे ढगाळ व पावसाळी वातावरणात उत्साहात स्वागत करण्यात आले. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिला उभे रिंगण सोहळा उत्साहात पार पडला.
तुकाराम, तुकाराम असा अखंड घोष अन् टाळ, मृदुंगाचा गजर करत वैष्णवांनी या सोहळ्यात हरिभक्तीचे रंग भरलेल्या अठरापगड समाजाचे विठुरायाची नाते जोडणाऱ्या या वैष्णवांच्या विराट मेळ्याने परब्रम्हाला साठवीत, अकलूज येथील शनिवारच्या मुक्कामानंतर रविवारी सकाळी ७.३० वाजता माळीनगरच्या दिशेने वाटचालीस प्रारंभ केला.
माळीनगर येथे पालखी सोहळ्याचे कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर नंदकुमार गिरमे, चेअरमन राजेंद्र गिरमे, होलटाईम डिरेक्टर सतीश गिरमे, संचालक राहुल गिरमे, शुगरकेन सोसायटीचे मॅनेजर अनिल गिरमे, ग्रामसेवक सचिन बनकर, अभिमान जगताप, अण्णासाहेब शिंदे, संग्राम भोसले, संजय दळवी, रिंकू राऊत तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी वर्ग, सवतगव्हाण, बिजवडी ग्रामपंचायत तसेच विविध संस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
तुकोबांच्या पालखीच्या आगमनाची आस लावून बसलेल्या भक्तांच्या नजरा अकलूजच्या दिशेने लागून राहिल्या होत्या. दरम्यान, भक्तीरसपूर्ण आणि विठ्ठलमय वातावरणात पालखी सोहळा सकाळी ८.५० वाजता माळीनगर येथील नवीन पालखी मार्गावरील नंदन नगर येथे येऊन थांबला.
अश्वांच्या पूजेनंतर पहिल्या अश्वाच्या घोडेस्वाराने उभ्या रिंगणात प्रथम फेरी मारली. त्यानंतर दुसऱ्या अश्वावर घोडेस्वार हातात पताका घेऊन स्वार झाला. अतिशय वेगाने धावणाऱ्या या अश्वाने तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेऊन फेरी पूर्ण केली आणि सर्व भक्तातून एकच माऊली… माऊली… माऊली… नावाचा उद्गोष झाला. रिंगण सोहळा संपल्यानंतर मॉडेल हायस्कूलच्या मैदानावरील ओपन थिएटरमध्ये पालखी सोहळा विसावला. यावेळी दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर नंदकुमार गिरमे यांच्या हस्ते गणेश पूजा, कलश पूजा, वरूणपूजा, पृथ्वी पूजा तसेच तुकाराम महाराजांच्या पादुकांची षोडशोपचारे पूजा व महाअभिषेक करण्यात आला. दुपारी १२ वाजता शंख ध्वनीने तुकाराम महाराज पालखी सोहळा बोरगावच्या दिशेने रात्रीच्या मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Ищите в гугле