ताज्या बातम्या

मी पाहिलेले सर्वोत्कृष्ट पंतप्रधान – ज्येष्ठ पत्रकार नवनाथ पोरे, पंढरपूर

पंढरपूर (बारामती झटका)

२००४ साली जेव्हा वाजपेयी सरकारचा पराभव झाला तेव्हा पंतप्रधान पदासाठी सोनिया गांधींच्या नावास भाजपने मोठा विरोध केला. सोनिया पीएम होतील ही शक्यता बघून उमा भारती, सुषमा स्वराज सारख्या महिला नेत्यांनी रस्त्यावर उतरून थयथयाट सुरू केला होता. दरम्यान सोनिया गांधींनी पंतप्रधान पद नाकारले आणि मग पंतप्रधान कोण होणार, याविषयी चर्चा सुरू झाली. काँग्रेस व्यतिरिक्त यूपीए घटक पक्षातून शरद पवारांचे ही नाव समोर आले होते.

मला मात्र, त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करावे आणि शरद पवार यांनी कृषी मंत्री पद घ्यावे, असे मनोमन वाटत होते. चार दिवसांच्या गोंधळानंतर पंतप्रधान पदासाठी डॉ. मनमोहसिंह यांचे नाव निश्चित झाले. आणि पुढची दहा वर्षे त्यांनी देशाला प्रगतीच्या दिशेने पुढे आणले.

शरद पवार आणि मनमोहनसिंग यांच्यात खूप चांगला सलोखा होता. अख्खे यूपीए सरकार या दोन नेत्यांमुळेच दहा वर्षे परिणामकारकरीत्या काम करू शकले. देशात शेतीच्या क्षेत्रात जे काही उल्लेखनीय बदल कृषी मंत्री म्हणून शरद पवार करू शकले, त्या मागे मनमोहन सिंग यांचे मजबूत समर्थन कारणीभूत होते.
७२ हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी असो, धान्यांच्या किमान आधारभूत किंमती वाढवणे असो, अन्न सुरक्षा कायदा असो की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष पॅकेज असो, सार्वजनिक प्रकल्पासाठी भूसंपादन कायदा असो, शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचा एवढा विचार त्यापूर्वी केला गेला नव्हता. नंतर ही केला गेला नाही.

एखाद्या प्रकल्पासाठी पिकाऊ जमिनीची गरज वरचेवर वाढणार हे लक्षात घेऊन भू संपादन कायद्यात सुधारणा केल्या गेला. मात्र त्या करताना शेतकऱ्यांचे आर्थिक आणि भावनिक नुकसान लक्षात घेतले. ज्या प्रकल्पासाठी जमीन घ्यायची आहे, त्या बाधित जमिनीच्या ८० टक्के शेतकऱ्यांची जमीन देण्याबाबत संमती आवश्यक आणि शासकीय मुल्यांकनाच्या पाच पट रक्कम नुकसान भरपाई देण्याची तरतूद मनमोहनसिंह सरकारने केली. (नंतर मोदी सरकारने यात बदल करून शेतकऱ्यांच्या घरावर त्याला न विचारताच बुलडोझर फिरवण्याची व्यवस्था करून ठेवली गेली, हा भाग वेगळा.) यूपीएतील डाव्या घटक पक्षांचा प्रखर विरोध असतानाही fdi कायदा मोठ्या निर्धाराने, सरकार पणाला लावून मंजूर करून घेतला.
देशाच्या विकासात मानवी मूल्यांची जपणूक करण्याचे धोरण मनमोहन सिंह सरकारचे होते. वाजपेयी सरकारच्या कुचकामी धोरणामुळे देश सर्व बाजूने अधोगतीला जाताना दिसत होता, नेमक्या वेळी देशाला सावरण्याचे काम मनमोहन सिंह सरकारने केले.

१९९१ साली जेव्हा देशाचे ७७ टन सोने परदेशी बँकांकडे गहाण पडलेले होते आणि केवळ १५ दिवस पुरेल एवढे परकीय चलन देशाच्या गंगाजळीत होते, त्या कठीण काळात नरसिंह राव यांनी मनमोहन सिंह यांची योग्यता ओळखून त्यांना अर्थमंत्री केले. आणि मनमोहन सिंह यांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवताना देशाच्या लाल फितीचा, नोकरशाहीचा कारभार बदलून बदलत्या जागतिक अर्थकारणाचे अवकाश खुले केले, यासाठी त्यांना भाजपचा विषारी विरोध पचवावा लागला.
२००४ साली वाजपेयी सरकारच्या धोरणांमुळे जेव्हा देश पुन्हा आर्थिक अरिष्टाकडे जाऊ लागला. शेतकरी खचून आत्महत्या करू लागला तेव्हा मनमोहन सिंह यांनीच देशाला सावरले आणि पुन्हा उभा करण्याचे काम केले. आपल्या धोरणावर, आपल्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता, म्हणूनच संसदेत विरोधक मौनी बाबा म्हणून हिणवत असताना डॉ. मनमोहसिंह यांनी ठणकावून सांगितले होते की,
इतिहास माझ्या कामाचे मूल्यमापन करताना मला झुकते माप देईल. माझ्या समवयस्क भारतीयांना इंदिरा गांधी यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पाहता आला नाही, मात्र त्यांच्यानंतर झालेले सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांचा उल्लेख करावा लागेल.
सलाम, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब !
नवनाथ पोरे,पंढरपूर

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना बारामती झटका परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. श्री पोरे सरांचे अप्रतिम विचार आहेत,
    सध्याच्या काही बनावटी जमान्यात वास्तवीक लिहणारे कमी आहेत, श्री पोरे सर त्यापैकी एक म्हणावे लागेल, ग्रेट सर लेखन, धन्यवाद बारामती झटका न्यूज 🙏❤️🙏💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button