मुंगी घाटात उत्साही अन रोमहर्षक वातावरणात, लाखो भाविकांच्या उपस्थितीत कावडी शिखर शिंगणापूरला पोहोचल्या…
शिखर शिंगणापूर (बारामती झटका)
महाद्या धाव… महाद्या धाव… अशी आर्त हाक देत अतिशय उत्साही, आनंदी, रोमहर्षक वातावरण मुंगी घाटातून कावडी चढवण्याचा सोहळा आज लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडला.
श्री संत गुरुजी बुवा तेली उर्फ तेल्या पूजाची आवड व इतर शेकडो मानाच्या कावडी आज कुठले ता. माळशिरस येथील अतिशय अवघड व लहान असणाऱ्या मुंगी घाटातून मानवी साखळी करून रात्री आठ वाजता शिखर शिंगणापूरला पोहोचल्या. यावेळी हजारो भाविक स्वागतास उभे होते.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले होत असणाऱ्या शिखर शिंगणापूरला शंभू महादेवाची वार्षिक यात्रा शुद्ध द्वादशी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. महाराष्ट्रातून आलेल्या हजारो कावडींचा जलाभिषेक करून महादेवाचे दर्शन घेतले जाते. भुत्याच्या कावडीचे दुपारी ३ वाजता आगमन झाले. यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी, अर्जुनसिंह मोहिते पाटील, वैष्णवीदेवी मोहिते पाटील, पोलीस उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, प्रभारी तहसीलदार तुषार देशमुख, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, महसूल नायब तहसीलदार अशीष सानप, सहाय्यक तहसीलदार अजित गोडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी स्वागत करून पूजन केले.
यावेळी उपसरपंच तानाजी किसवे, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत शिंदे, माजी उपसभापती प्रताप पाटील, माजी सभापती शोभा साठे, माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, अनिता बलाक्षे-वाणी, ग्रामसेवक रवींद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मानाच्या पाच आरत्या करण्यात आल्या. यावेळी अंथरूड गुनावरे ता. फलटण येथील वाटाड्याच्या मानाची कावड सोबत होती. सायंकाळी सहा वाजता मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. हर हर महादेव, असा नाद दरीतून घुमत होता. अतिशय अवघड व जीकिरीचा असणारा हा घाट अतिशय शिस्तीत मानवी साखळीने पार पडला. सासवड परिसरातील लोकांच्या बरोबरीनेच कन्हेर ता. माळशिरस, येथील शेकडो भाविक भक्तांचा हात कावड चढवण्यासाठी मदत करत होता. अवघड टप्पे पार करीत असताना खालून भावीक टाळ्या वाजवून घोषणा देत कावडी धारकांना प्रोत्साहन देत होते.
सायंकाळी सात वाजता कावड शिखर शिंगणापूरला पोहोचली. यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले, विविध खात्यातील अधिकारी, तहसीलदार, सरपंच, पुजारी आणि मानकरी यांनी स्वागत केले. रणरणत्या उन्हात सकाळपासून लाखो भाविक कावडी चढवण्याचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जागा मिळेल तिथे बसून होते. अतिशय उत्साहात, भावपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng



