युरिया लिंकींग करणार्यांवर तात्काळ कारवाई करा – स्वाभिमानी ची कृषीमंत्र्यांकडे मागणी.
मुंबई (बारामती झटका)
राज्यभरात रासायनिक खते व बी-बियाणे यांची टंचाई होते आहे, यामुळे शेतकरी सध्या हवालदिल आहे. याच प्रश्नाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीत राज्यातील शेतकर्यांना खत दुकानदारांकडून वेळेवर युरिया मिळत नाही, युरिया कमी प्रमाणात दिला जातो, युरिया घ्यायचा असेल तर सोबतच इतर खते बळजबरीने त्यांना खरेदी करण्यासाठी दुकानदार भाग पाडत आहेत, यामुळेच शेतकऱ्यांचे विनाकारण अधिकचे पैसे देखील जातात. आणि विशेष म्हणजे या युरिया लिंकींगच्या साखळीमध्ये कृषीविभागाचे अधिकारी देखील सामिल आहेत, त्यामुळेच युरीया लिंकींग हे लोन सर्वत्र पसरले आहे. हे सर्व प्रश्न बागल यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आणुन दिले.
युरिया खत लिंकींगमुळे सध्या शेतकर्यांना ऐन पावसाळ्यात खते मिळत नाहीत, पिकांच्या फळधारणा कालावधीतच जर खते मिळाली नाहीत तर राज्यातील शेतकर्यांचे उत्पादन घटेल व त्यामुळे त्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे बागल यांनी मंत्री सत्तार यांचे लक्ष वेधले. तसेच सध्या पावसाळा सुरू आहे. अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जी मदत मिळणार आहे ती पुरेशी नाही त्यामध्ये वाढ करावी व एकही शेतकरी वंचित न ठेवता अतिवृष्टीग्रस्त भागातील सरसकट शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना मदत करावी, अशीही मागणी बागल यांनी यावेळी मंत्री सत्तार यांच्याकडे केली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng