यूरियाला पर्याय म्हणून अमोनियम सल्फेटचा वापर करा – सतिश कचरे, मंडळ कृषि अधिकारी
नातेपुते (बारामती झटका)
युरिया हे खत नत्राचा स्रोत म्हणुन सर्वाधिक जास्त प्रमाणात वापरले जाते. ज्या जमिनीचा सामु जास्त आहे आणि जेथे जास्त तापमान आहे, अशा जमिनीत युरिया पासुन अमोनियम (NH₄⁺) च्या स्वरुपातील उपलब्ध नत्र पिकास मिळत असतानाच बहुतांश भाग हा व्होलाटायझेशनमुळे अमोनियाच्या (NH₃) स्वरुपात रुपांतरित होवुन पिकांस उपलब्ध न होता हवेत विरुन जातो. हा प्रकार जमिनीच्या पृष्ठ भागावर टाकलेल्या युरियाच्या बाबतीत जास्त प्रमाणात होतो आणि युरिया दिल्यानंतर 3 आठवड्यात बहुतांश युरिया हा अशा प्रकारे वाया जातो. तसेच युरिया दिल्यानंतर जमिनीचा पीएच देखिल त्या तेवढ्या भागापुरता वाढतो.
CO(NH₂)₂ (Urea ) + H⁺ + 2H₂O——> 2NH₄⁺ + HCO₃⁻ (Hydrolysis – युरिएज Urease या एन्जाईम मुळे होते)
युरिया चे हायड्रोलिसीस झाल्यानंतर तयार झालेला बायकार्बोनेट (HCO₃⁻) हा जमिनीतील कॅल्शियम सोबत क्रिया होवुन कॅल्शियम कार्बोनेट तयार करते (CaCO₃), तसेच ह्या क्रियेत हायड्रोजन (H⁺) मुक्त होवुन सामु वाढण्यास प्रतिबंध देखील होतो. त्यामुळे ज्या जमिनीत कॅल्शियम चे प्रमाण जास्त असते अशा जमिनीत युरियामुळे सामु बदलास अटकाव घातला जातो. मात्र सततच्या युरियाच्या वापराने कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण देखिल वाढते. तरी देखील ज्या जमिनीचा सामु हा जास्त आहे अशा जमिनीत युरिया दिल्याने युरियाची उपलब्धता कमी होणे, आणि सामु वाढणे या दोन क्रिया घडतात. ज्यावेळेस जमिनीत पाणी कमी असते तसेच जास्त तापमान असते त्यावेळेस हि क्रिया झपाट्याने होते. ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, अशा जमिनीत अमोनियम सल्फेटचा वापर हा सामु कमी करणे आणि व्होलाटायझेशन कमी करणे यासाठी देखील फायदेशिर ठरतो. कारण अमोनिमय सल्फेट हे कोणत्याही परिस्थितीत 10 ते 14 टक्के इतकेच व्होलाटायझेशन होते. तर युरियाचे व्होलाटायझेशन हे 20 ते 30 टक्के इतके असते.
योग्यरितीने वापरल्यास अमोनियम सल्फेट हे एक फार चांगले खत आहे. अमोनियम सल्फेटमध्ये 21% अमोनियम स्वरुपातील नायट्रोजनचे प्रमाण आणि 24% सल्फेट म्हणजेच सल्फर आहे. अमोनियम सल्फेटचा प्राथमिक वापर अल्कधर्मी मातीसाठी खत स्वरूपात केला जातो, कारण अल्कधर्मी जमिनीमध्ये मातीचा सामू या खताच्या वापरामुळे कमी करणे शक्य होते. अमोनियम सल्फेट हे पाणी विद्रव्य किटकनाशके, हर्बासाइड्स, आणि बुरशीनाशकसाठी शेती स्प्रे सहाय्यक म्हणून देखील वापरले जाते. तिथे पाणी आणि वनस्पती पेशी या दोन्हीमध्ये लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण बांधायला चांगले कार्य करते. हे 2, 4-डी (एमाइन), ग्लायफोसेट आणि ग्लूफोसिनेट जंतुनाशकांसाठी सहायक म्हणून प्रभावी आहे. तसेच हे अमोनियम सल्फेट हे मिश्र खत असल्यामुळे वनस्पतीला सल्फर (गंधक) अगदी सहजगत्या उपलब्ध होतो. अमोनियम सल्फेटच्या वापरामुळे पानातील हरितद्रव्याची वाढ होते, त्यामुळे वनस्पतीच्या पानाचा रंग गडद हिरवा राखण्यासाठी मदत होते. या खताच्या वापरामुळे जमिनीची संरचना सुधारते व पाणी मुरण्यास मदत होते. तसेच सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यासाठी अमोनियम सल्फेटचा वापर केला जातो. शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात येते एक तर फवारणीसाठी नॅनो युरिया वापर व जमिनिचे आरोग्य अबाधीत ठेवून पुढच्या पिढीला सदृढ काळी आई आरोग्यमय उत्पादनक्षम सोपावयची असेल तर युरियाचा नगण्य वापर करण्याचे आवाहन मंडळ कृषि अधिकारी नातेपुते सतीश कचरे यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng