रत्नत्रय शैक्षणिक संकुलात विद्यार्थी बनले शिक्षक
मांडवे (बारामती झटका)
गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिनाच्या निमित्ताने मांडवे ता. माळशिरस येथील रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापकापासून ते शिपाई पर्यंतची सर्व जबाबदारी विद्यार्थ्यांनी घेतली. प्रत्येक वर्गात जाऊन शिक्षकांप्रमाणे विद्यार्थ्यांनी शिकवले. नेहमी प्रमाणे वर्गात तास घेण्यात आले. रत्नेश दोशी व साक्षी ठोंबरे या दोन विद्यार्थ्यांनी अनुक्रमे इंग्लिश मिडियम व सेमी इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी पार पाडली.
सदर प्रसंगी बोलताना एक दिवसाचे मुख्याध्यापक रत्नेश प्रमोद दोशी म्हणाले, आजच्या दिवशी शिक्षकाचे अध्यापनच्या पलीकडे व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे काम असल्याचे मला आज समजले. तसेच एक दिवसाच्या शिक्षिका स्नेहल खरात म्हणाल्या की, आजचा दिवस हा माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय असून हा दिवस मी कधीही विसरू शकणार नाही.
यावेळी संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी यांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व यापुढे असेच वेगवेगळे उपक्रम राबवले जावेत अशा सूचना दिल्या.
चेअरमन प्रमोद भैय्या दोशी यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षकांशी चर्चा केली व भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेच्या वतीने या दोन्ही मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी, चेअरमन प्रमोद भैय्या दोशी, मुख्याध्यापक अमित पाटील, दैवत वाघमोडे व सतीश हांगे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng