रविकांत तुपकरांच्या नेतृत्वातील हिंगोलीतील शेतकऱ्यांच्या रेकॉर्डब्रेक मोर्चाला यश..
हिंगोली (बारामती झटका)
रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीत शेतकऱ्यांचा रेकॉर्डब्रेक मोर्चा वन अधिकारी कार्यालयावर धडकला. उभ्या पिकात माकडे, कोल्हे, बिबटे, रोही, हरीण आणि असे अनेक वन्यप्राणी घुसून पिकाची प्रचंड नासधूस करतात. परंतु, सरकार मात्र या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करत नाही, म्हणूनच आज हजारो शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आणि गोरेगाव ते हिंगोली असा २०० गाड्यांचा ताफा आणि ५००० हून अधिक शेतकरी हिंगोली वनविभागाच्या दिशेने निघाले. मोठ्या पोलिस बंदोबस्तात हा मोर्चा ५ ते ६ किमी अंतर कापत हिंगोलीच्या वनविभाग कार्यालयावर पोहोचला. मागण्या मान्य करेपर्यंत तिथे हजारो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. अखेर शेतकऱ्यांच्या रुद्रावतारासमोर प्रशासनाला नमणे भाग पडले..!
स्वतः वनमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी रविकांतभाऊ तुपकरांशी फोनवरून दीर्घ चर्चा केली व बहुतांश मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले, हे या मोर्चाचे मोठे यश आहे.
वनमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार व रविकांतभाऊ तुपकर यांच्यात काय बोलणे झाले…?
* वन्यप्राण्यांमुळे शेती पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करावे व वन्यप्राण्यांमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई वाढवून मिळावी, या प्रमुख मागण्या होत्या.
* ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी यावर पुढील १५ दिवसांत राज्य सरकार शेतीला कंपाऊंड करण्याच्या वैयक्तिक व गावपातळीवरील योजनेला मान्यता देणार आहे. तसेच वन्यप्राण्यांमुळे झालेल्या शेतीपिकांची नुकसान भरपाई दुप्पट किंवा तिप्पट करून ३० दिवसांच्या आत भरपाई देण्यासंदर्भात या अधिवेशनात कायदा पास करणार असल्याचे आश्वासन दिले.
* तसेच हिंगोली जिल्ह्यातील संवेदनशील गावांमध्ये तातडीने कंपाऊंड करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही सुधीरभाऊंनी दिले.
* हिंगोली वनविभागाने वानरांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी आजच पथके रवाना केली आहे. त्यामुळे बहुतांश मागण्या मान्य झाल्याने आम्ही मोर्चा स्थगित केला.
जर येत्या १५ दिवसांत शेतीला कंपाऊंड करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला नाही व दिलेले आश्वासन पाळले नाही, तर राज्यभरातुन हजारो शेतकरी बांधव आपली पाळीव जनावरे जसे की, गाई, म्हशी, कुत्रे, मांजरे मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नेवून सोडतील..! असा कडक इशारा रविकांतभाऊ तुपकर यांनी यावेळी दिला.
या मोर्चाचे यशस्वी आयोजन गजानन कावरखे व नामदेव पतंगे व सहकाऱ्यांनी केले होते.
यावेळी दामूअण्णा इंगोले, हिंगोली कृ.ऊ.बा.चे सभापती राजेशभैय्या पाटील, पराग अडकीणे, मुनिर पठाण, मदनलाल कावरखे, भास्कर पाटील, गजानन सावंत, दशरथ मुळे, सतीश वैद्य, माधव वाघ, सखाराम भाकरे, सतीश माहोरकर, बालाजी मोरे, विशाल गोरे, सतीश इढोळे, गजानन पैठणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng