राष्ट्रवादी काँग्रेसच्या आसमंतातील एक ध्रुव तारा निखळला – आ. ॲड. अशोक रावसाहेब पवार
शिरूर (बारामती झटका)
पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सरचिटणीस म्हणून अजय हिंगे पाटील यांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार, खासदारांनी केलेली कामं आणि पक्षाची एकंदर भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यात अजय हिंगे पाटील यांचे मोठे योगदान होते. या सगळ्यामुळे अजय पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपासून आमदार-खासदार ते तळागाळातील कार्यकर्त्यांशी जवळीक होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्तुळात स्वत:ची विशेष ओळख निर्माण करणारे अजय हिंगे पाटील यांचे मंगळवारी निधन झाले. अजय हिंगे हे एका अपघातात जखमी झाल्यामुळे ते तब्बल १७ वर्षे अंथरुणाला खिळून होते. मात्र, या काळात अजय हिंगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियाचे काम प्रभावीपणे केले होते.
आ. ॲड. अशोक रावसाहेब पवार यांनी स्व. अजय हिंगे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आसमंतातील एक ध्रुव तारा निखळला. हे दुःख सहन होण्यासारखे नाही. जीवनातील मोठ्या संघर्षाला सामोरे जाऊनही पुरोगामी विचारांचा प्रभावी प्रसार करणारे लढवय्ये व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून गेले, यावर विश्वास बसत नाही. १७ वर्षांपासून अंथरुणाला खिळून देखील मनाने चैतन्यपूर्ण जगणारा हा युवक, हजारो युवकांना प्रेरणा देऊन गेला. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सरचिटणीस म्हणून त्यांनी निभावलेली जबाबदारी अतुलनीय आहे.
आपल्या सोशल मीडियाचा प्रोफाईल फोटो म्हणजे आपली ओळख असते. आ. अजितदादा यांचा फोटो त्यांनी ३ दिवसांपूर्वीच आपल्या फेसबुक प्रोफाईल केला होता. जणू काही त्यांना कळलेच होते, आपले जीवितकार्य पूर्ण झाले. त्यांनी ओळख बदलून आ. अजितदादांचा प्रोफाईल फोटो ठेवला होता म्हणजेच जाताना त्यांनी आपली ओळख पुसून आपल्या नेतृत्वाची ओळख कायमस्वरूपी ठेवली. त्यावरून त्यांची कार्यावरची निष्ठा प्रकटते. खूप काही बोलायचे आहे.. पण आज ते शक्य होत नाही.. माझी प्रत्येक पोस्ट हजारो लोकांपर्यंत पोहोचवून कार्यात सहकार्य करणारा माझा आवाज आज क्षीण झाला, अशा भावपूर्ण शब्दांत त्यांनी स्व. अजय हिंगे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng