रुंदीकरणाची बैठक उधळली, बैठकीतील गोंधळामुळे मूळ विषयाला बगल
गोंधळामुळे आ. संजयमामा शिंदे बैठक सोडून निघून गेले
करमाळा (बारामती झटका)
भावी काळात होणारे गंभीर अपघात टाळण्यासाठी व निष्पाप लोकांचे प्राण वाचवण्यासाठी खंडोबा मंदिर ते देवीचा माळ पायथा रस्त्याच्या दोन्ही बाजूने पंधरा फुटाचा सर्विस रोड करणे, देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्त्याचा कॉर्नर मोठा करणे, रस्त्याच्या मधोमध येणारे गेवराईचे छोटे मंदिर बाजूला घेणे या विषयांवर चर्चा करण्यासाठी करमाळा तहसील कार्यालयात आमदार संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग वीज महामंडळ व त्याचे ठेकेदार, प्रतिनिधी, भवानी देवी ट्रस्टचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
मात्र, यावेळी छोटे मंदिर बाजूला घेण्यावरून काहीजणांनी विनाकारण मोठा गोंधळ केला व जाणीवपूर्वक अनेक लोकांना आपले मत मांडू दिले नाही. वैयक्तिक वादावरून या चर्चेला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. त्यामुळे ही बैठक गोंधळात होऊन कोणताही ठाम निर्णय होऊ शकला नाही. गोंधळाची परिस्थिती पाहता आ. संजयमामा शिंदे बैठक सोडून अर्ध्यातूनच निघून गेले.
देवीचा माळ पायथा चौक व खंडोबा मंदिर चौक हा मृत्यूचा सापळा होणार असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्विस रोड असावा, अशी ग्रामपंचायतीची मागणी आहे. शिवाय खंडोबा मंदिराकडून देवीच्या माळावर जाणारा कॉर्नर मोठा करावा, चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा याबाबतचे लेखी पत्र आम्ही बांधकाम खात्याला दिली आहे. या पत्रावर सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत.
या ठिकाणी भावी काळात होणारे मोठे अपघात लक्षात घेता योग्य तो निर्णय प्रशासनाने घ्यावा. – महेश सोरटे, सरपंच, देवीचा माळ
हा प्रश्न भावनिक न करता येणाऱ्या काळात होणारे अपघात टाळण्यासाठी पायथ्याशी असलेले छोटे मंदिर बाजूला घ्यावे व दोन्ही बाजूनी 15 फुटाचा सर्विस रस्ता करावा. या दोन्ही बाजूची जागा कमलादेवी ट्रस्टच्या मालकीची आहे. हा रस्ता करण्यास आम्ही मान्यता दिली आहे. सोमनाथ चिवटे, अध्यक्ष, कमला भवानी देवी ट्रस्ट
काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी व वैयक्तिक वादातून या लोकहिताच्या कामाला विरोध करत आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा बाजूने 15 मीटरचा सर्व्हिस रस्ता करावा, पायथ्याशी असलेले चार बाय चार चे मंदिर एका बाजूला घ्यावे, शिवाय खंडोबा माळ येथे निर्माण होणाऱ्या चौकात ही सर्व कामे ठेकेदारांनी करून द्यावीत, याबाबत आ. संजयमामा शिंदे यांनी पुढाकार घ्यावा. स्वार्थासाठी चांगले कामाला विरोध करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करणे गरजेचे आहे. – महेश चिवटे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
देवीचा माळ येथे राहणारे काही ठराविक ग्रामस्थ स्वतःला या मंदिराचे मालक असल्याचे समजतात व विकासात्मक कामाला आडवं येतात, यामुळे कमलाभवानी देवी भक्तातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng