लाईट वेळेवर येत नाही मात्र, लाईट बिल न चुकता वेळेवर येते..

माळशिरस शहरात विजेचा लपंडाव; नागरिक, व्यापारी, व्यावसायिक हैराण झाले आहेत…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसातून कितीतरी तास लाईट नसते. त्यामुळे अनेक व्यापारी, व्यावसायिक व स्थानिक नागरिक हैराण झालेले आहेत. लाईट वेळेवर येत नाही मात्र, दर महिन्याला लाईट बिल न चुकता वेळेवर येते. तरीसुद्धा ग्राहक लाईट बिल भरत आहेत. माळशिरस शहरात लाईटचा लपंडाव बंद करून पूर्ण दाबाने व पूर्ण वेळ लाईट करावी, अशी व्यापारी व व्यावसायिक यांची मागणी आहे.माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण आहे.
या शहरांमध्ये न्यायालय, जिल्हा न्यायालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये आहेत. तालुक्यातील नागरीक कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी येत असतात. त्यावेळेस त्यांना लाईट नसल्याचा नाहक त्रास होत आहे. सर्वच ठिकाणी इन्व्हर्टर असतात असे नाही. कधी कधी इन्व्हर्टरचीसुद्धा बॅटरी डाउन होऊन बंद पडलेले असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना विविध दाखले, उतारे काढताना अडचणी उद्भवत आहेत. शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना व अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लाईट नसल्याने अडचणी येत आहेत. अशावेळी ग्रामीण भागातील लोकांना महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा वाईट अनुभव येत आहे. सुज्ञ नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना लाईटविषयी फोन करून चौकशी केल्यास कामकाज सुरू आहे, अशी उत्तरे मिळत असतात.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामाची तयारी सुरू असते, त्यावेळेस पालखी सोहळ्याच्या तयारीच्या नावाखाली नागरिक महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांचे ऐकून घेत असतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असताना दोन महिन्यापासून लाईट बंद करून कामकाज केले असताना सुद्धा दोन तास लाईट पालखी मुक्कामाच्या वेळेस गायब झालेली होती. त्यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या गलथान कारभाराच्या फटका स्थानिक नागरिक, व्यापारी, व्यावसायिक व कामानिमित्त बाहेरून येणारी जनता हैराण झाली आहे. यासाठी निर्ढावलेले महावितरणचे कर्मचारी व अधिकारी यांची उचलबांगडी करून नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी त्रस्त व सर्वसामान्य जनतेच्या मागणीने जोर धरलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng