लावणी कलावंत प्रमिला सूर्यवंशी लोदगेकर महाराणी छत्रपती सौ. सईबाई भोसले कला गौरव पुरस्कार प्रदान
अकलूज (बारामती झटका)
नटरंग कला केंद्र मोडलिंब येथील लावणी कलावंत प्रमिला सूर्यवंशी लोदगेकर यांना मराठी लावणीतील योगदानाबद्दल महाराणी छत्रपती सौ. सईबाई भोसले कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रुपये 11 हजार, मानपत्र, स्मृतिचिन्ह, श्रीफळ व पुष्पहार अशा स्वरूपाचा होता. हा पुरस्कार सौ. शुभदा पाटील व सौ. उज्वला टिळेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
जय हिंद मित्र मंडळ विडणी ता. फलटण यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त व मंडळाच्या पन्नासावा वर्धापन दिनाचे औचित्य साधून मान्यवरांचे पुरस्कारांचे आयोजन केले होते. याप्रसंगी अभिनेते लेखक साहित्यिक चित्रपट निर्माते प्रवीण तरडे व अभिनेत्री सौ. स्नेहल तरडे यांनाही यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पानिपतकार व महाकादंबरीकार विश्वास पाटील हे होते. त्याचबरोबर सध्या युट्युब वर गाजत असलेली चांडाळ चौकडीच्या करामतीचे कलाकारही यावेळी उपस्थित होते. लावणी कलावंत प्रमिला लोदगेकर यांनी अकलूज येथील राज्यस्तरीय लावणी स्पर्धेमध्ये सलग तीन वेळा प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक केली होती. तसेच त्यांना मानाचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील लावणी कलावंत पुरस्कारही मिळाला आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विशेष लावणी पुरस्कार, अखिल भारतीय साहित्य परिषद यांचा लावणी कला गौरव पुरस्कार, अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन यांचा लावणीसम्राज्य पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य संमेलन बेळगाव व रत्नागिरी येथे विशेष सन्मान, दि प्राइड ऑफ इंडिया व ग.दि.मा. पुरस्काराने ही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये पारंपारिक लावणीचे सादरीकरण करून लावणी क्षेत्रात पारंपारिक लावणीचा बाज जपण्यात प्रमिला लोदगेकर यांनी योगदान दिले आहे. त्याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्राच्या लावणीचे परदेशातही सादरीकरण केले आहे. या सर्व लावणीकलेच्या सेवेबद्दल त्यांचा सौ. सईबाई भोसले कला गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng