लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे लवकरच धावणार मात्र, रेल्वे ट्रॅक जुना की नवा माळशिरस तालुक्यात संभ्रमावस्था…
माळशिरस तालुक्यात दोनदा रेल्वे मार्गाचा सर्वे झालेला असल्याने भूसंपादित शेतकरी व जनतेच्या मनात शंका
माळशिरस ( बारामती झटका )
पंढरपूर-फलटण मार्गाचे सर्वे करण्याचे आदेश निघाले असल्याची माहिती रेल्वेमंत्री खा. अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. याबाबत माढा लोकसभा खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून या मार्गाचा सर्वे आता लवकरच होणार आहे. पंढरपूर-लोणंद हा मार्ग सुरू होण्याची शक्यता तयार झाली आहे. यामुळे पंढरपूर-पुणे-मुंबई हा रेल्वे मार्ग सुकर होऊन रेल्वे लवकरच धावणार आहे. मात्र, रेल्वे ट्रॅक जुना की नवा, याविषयी माळशिरस तालुक्यात संभ्रमावस्था आहे. माळशिरस तालुक्यात दोनदा रेल्वे मार्गाचा सर्वे झालेला असल्याने भूसंपादित शेतकरी व जनतेच्या मनात शंका उपस्थित होत आहे.

लोणंद-फलटण-पंढरपूर या रेल्वे मार्गापैकी लोणंद ते फलटण रेल्वे मार्ग तयार झालेला आहे. फलटण ते पंढरपूर 105 किलोमीटरचा मार्ग सुरू होणार आहे. सर्वे करण्याचे आदेश रेल्वे मंत्री यांनी दिलेले आहेत. यापूर्वी झालेले सर्वे तेच राहणार का, नवीन सर्वे होऊन जमिनी भूसंपादन होणार, अशी माळशिरस तालुक्यात शेतकऱ्यांमधून शंका उपस्थित केली जात आहे.
पूर्वी रेल्वे ट्रॅकसाठी जमिनी भूसंपादित झालेल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर शिसपेन्सिलने रेल्वे भूसंपादन असा उल्लेख होता. काही शेतकऱ्यांनी रेल्वे ट्रॅक भूसंपादित झालेल्या ठिकाणच्या जमिनी कसत आहेत. काहींनी घरे बांधलेली आहे. रेल्वे अधिकारी व माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यातील रेल्वेसाठी भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन संभ्रम दूर करावा. रेल्वे ट्रॅकसाठी जमिनी भूसंपादित करण्याकरता शेतकरी बांधव तयार आहेत. त्यामुळे रेल्वे अधिकारी यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन फलटण पंढरपूर रेल्वेचा ट्रॅक पूर्ण करावा, अशी माळशिरस तालुक्यातून मागणी होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng