वेगाने पसरणाऱ्या आय फ्लू बाबत काळजी घेण्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

सोलापूर (बारामती झटका)
डोळे येण्याची साथ (आय फ्लू) आता वेगाने वाढत चालली असून रुग्णांची संख्या वाढत आहे. वातावरणातील अनिश्चित बदलांमुळे साथीचे रोग पसरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे डोळे येणे. राज्यात सध्या डोळ्यांची साथ पसरली आहे. लहान मुलांना डोळे येण्याचे प्रमाण अधिक आहे. यावर्षी डोळ्यांचा संसर्ग सौम्य स्वरूपाचा दिसत असला तरी, संसर्ग मात्र मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्या. गरज असल्यास डॉक्टरांकडे जावा, अशा सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरसह पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात डोळ्यांची साथ जोमाने वाढत आहे. डोळे येण्याचा आजार हा औषधांशिवाय बरा होऊ शकतो. रुग्णांना घाबरून जाण्याची गरज नाही. दिवसातून हात पाच वेळा स्वच्छ धुवा. डोळे पाण्याने स्वच्छ करा. मेडिकलमध्ये जाऊन स्टेरॉईड डोळ्यांमध्ये सोडले तर धोका संभवू शकतो. मात्र, डोळे आलेल्या रुग्णांपासून दूर राहा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा
डोळे आलेल्या रुग्णांची उपचारासाठी ग्रामीण तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी वाढत आहे. दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांना त्यावरील योग्य उपचार व औषध मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले औषध संपले असून त्याचा पुरवठा होत नसल्याची ओरड आहे.
डोळे येण्याची लक्षणे
- डोळे लाल होणे आणि पिवळसर द्रव डोळ्यातून येणे.
- डोळ्यातून सतत पाणी येत राहणे.
- डोळे सतत चोळावेसे वाटणे.
दोन्ही डोळ्यांना एकदम सुज येणे. - डोळ्यांना सतत खाज येणे. पापण्या एकमेकांना चिकटणे.
- असामान्यपणे डोळ्यातून जास्त अश्रू येणे.
- डोळ्यातून पाण्यासारखा किंवा घट्ट स्त्राव येणे.
अशी घ्या डोळ्यांची काळजी
- डोळे किंवा चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर हात धुवून घ्या.
- टेबलाचा पृष्ठभाग आणि दरवाजाचे हँडल यांसारख्या सार्वजनिक वापराच्या वस्तूंना कमीत कमी स्पर्श करा.
- तुमचे डोळे लालसर आहेत, तोपर्यंत शाळेत किंवा कामावर जाणे टाळा.
- दुसऱ्यांचे औषध, आय ड्रॉप वापरू नका. दुसऱ्यांचे टॉवेल, उशी आणि बेडशीट यांसारख्या वस्तू वापरणे टाळा.
घाबरू नका, काळजी घ्या. – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री
डोळे येण्याचा आजार हा संसर्गजन्य आहे. सध्या तो सर्वत्र पसरत आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, डोळे चोळू नये, डोळे स्वच्छ, थंड पाण्याने धुवावेत, त्रास होत असल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. वाढत चाललेला हा आजार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत लवकरच त्यावर नियंत्रण मिळेल.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng