Uncategorizedताज्या बातम्या

वेळापुरात माऊली पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत…

आज ठाकूरबुवा येथे गोल रिंगण सोहळा तर, टप्पा येथे होणार माऊली व सोपान यांची बंधुभेट

वेळापूर (बारामती झटका)

माळशिरस मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वेळापूरचे ग्रामदैवत अर्धनारी नटेश्वराच्या नगरीत उत्साही, भक्तीमय वातावरणात, वैष्णवांचे हरिनामाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

यावेळी लाखो वारकरी ज्ञानेश्वर माऊलींचा धावा करत होते. हा पालखी सोहळा वेळापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ३.३२ वा. पोहोचल्यानंतर सरपंच रजनीश बनसोडे, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग ठवरे, उपसरपंच तानाजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दीपक राऊत, संजय मंडले, अमृतराव माने देशमुख, महादेव म्हेत्रे, काशिनाथ आडत, चव्हाण, शंकर आडत, पिनू येडगे, बाळासाहेब म्हेत्रे, कुदळे महाराज व ग्रामस्थ यांच्यावतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

दरम्यान, माळशिरसच्या मुक्कामानंतर पुढे लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाच्या सरी घेत असतानाही माऊलींच्या टाळ-मृदुंगाचा गजर करत पालखी सोहळा वेळापूर येथे मुक्कामी निघाला.

तुका म्हणे धावा
आहे पंढरी विसावा
या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे वारकऱ्यांची पावले विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने धुमाळी या ऐतिहासिक उतारावरून हा सोहळा विसाव्याच्या ठिकाणी ३.५० वा. आला. या ठिकाणी येताना उतारावरून धावा करत आल्यानंतर नवीन बांधलेल्या विसावा कट्टा येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या. यानंतर मानकरी ह. भ. प. महादेवराव ताटे, ॲड. दादासाहेब ताटे व ताटे परिवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. तसेच पालखी सोहळा प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला. या ठिकाणी पारंपारिक पद्धतीनुसार भारुड, अभंग व गीते सादर करण्यात आली. यानंतर पालखी ग्रामस्थांनी खांद्यावर घेऊन ‘माऊली माऊली’ च्या जयघोषात पालखीतळाच्या मुक्कामी दिशेने हा पालखी चौक येथे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्यावतीने सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच तानाजी चव्हाण, दादासाहेब राजेघाडगे, संजय मंडले, भाऊसाहेब जानकर, विठ्ठल देवकाते, संदीप माने देशमुख, संजय देशपांडे, राजा देवकते, महेश देवकते व ग्रामस्थ यांनी माऊलींच्या गजरात पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

यानंतर पालखी सोहळा मुख्य तळावर विसावल्यानंतर माऊलींच्या पादुकांची आरती करण्यात आली. यानंतर भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. यावेळी भाविकांना दर्शनासाठी पोलीस प्रशासन व पोलीस मित्र यांनी मदत केली. यानंतर दिंडीतील वारकऱ्यांनी आपापल्या राहुट्यांकडे धाव घेतली. यावेळी रात्रभर वैष्णवांचे विविध अभंग आणि कीर्तन सुरू होते‌.

वेळापूर नगरीत लाखो भाविक दाखल झाल्याने वेळापूर शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यासाठी वेळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाबत्ती, पिण्याच्या पाण्याची सोय यासह नेटके नियोजन करण्यात आले.

पालखी सोहळा मुक्काम काळात सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अकलूजचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली चौक, निमगाव रस्ता, पालखी मार्ग, वेळापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, कमांडो, होमगार्ड, पोलीस मित्र यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब ओव्हाळ व डॉ. नंदवटे, आरोग्य कर्मचारी यांनी चार विविध केंद्रांवर मोफत औषधोपचार केले. सोमवार दि., 26 जून रोजी वेळापूर येथे पुढे माऊलींची पालखी मार्गक्रमण करेल.

आज तिसरे गोल रिंगण
ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होणार आहे, तर तोंडले बोंडले येथे दुपारी विसावा करून पुढे व पंढरपूर तालुक्यातील टप्पा (वाडी कुरोली) येथे माऊली व सोपानदेव यांची बंधुभेट आहे. याची उत्सुकता भाविकांना लागली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. Great job on this piece! It was very informative and engaging. I’m eager to hear different perspectives on this. Click on my nickname for more engaging content.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button