Uncategorizedताज्या बातम्या

वेळापूर पालखी मार्गावरील सर्व्हिस रस्ता करुन देण्याचे महामार्ग प्रकल्प संचालक केशव घोडके यांचे अवताडे कन्स्ट्रक्शन कंपनीला आदेश.

वेळापूर (बारामती झटका)

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील वेळापूर येथील उड्डाण पुलापुर्वी सर्व्हिस रस्त्याचे काम करुन द्या, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले असून राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक केशव घोडके यांनी अगोदर सर्व्हिस रोड करुन देण्याचे आदेश मे. एस. एम. अवताडे कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहेत. 

श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर या पालखी मार्ग एन एच ९६५ चे काम सध्या वेगाने चालू असून वेळापूर ता. माळशिरस, येथे उड्डाण पुलाचे नियोजन आहे. सदर उड्डाण पुलाचे काम हे पूर्व-पश्चिम चालू असून दक्षिण बाजूकडील सर्व्हिस रोडचे काम न करता उड्डाण पुलाचे काम चालू करण्यात आले आहे. सदर रोडलगत वेळापूरातील लहानमोठ्या व्यापाऱ्यांची ११५ दुकाने आहेत. दिवाळी सण तोंडावर असल्याने दिवळी खरेदीसाठी दुकानामधून तुरळक गर्दी वाढू लागली आहे. मे. एस. एम. अवताडे कंपनीने पालखी मार्गाच्या उत्तरेचा सर्व्हिस रोड केला परंतु, ज्या बाजूला गाव व व्यापाऱ्यांची दुकाने आहेत तेथे सर्व्हिस रोडचे काम न करताच पुलाचे काम सुरु केल्याने ग्राहकांना दुकानात येण्यास अडचण निर्माण झाली आहे. 

 मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता कुठे कोरोनातून बाहेर येवून व्यापार पुर्वपदावर येत असतानाच ऐन दिवाळीच्या तोंडावर पालखी मार्गाच्या उड्डाण पुलाचे काम सुरु झाल्याने व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सर्व्हिस रोड न करताच उड्डाण पुलाचे काम चालू केल्याने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. 

सदर उड्डाण पुलाचे काम असेच चालू राहिल्यास आंदोलन करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला होता. उड्डाण पुलाचे कामापुर्वी दोन्ही बाजुच्या सर्व्हिस रोडचे काम करा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक केशव घोडके, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार जगदीश निंबाळकर वेळापूर पोलिस स्टेशन यांना दि. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी निवेदन देवुन केली होती.

या मागणीची दखल घेत प्रकल्प संचालक केशव घोडके यांनी अभियंता अजित पवार व मे. एस. एम. अवताडे कन्स्ट्रक्शन कंपनीचे शुभम जाधव यांना वेळापूर येथे पाठवून व्यापाऱ्यांशी दि. १४ ऑक्टोबर रोजी चर्चा केली. यावेळी प्रकल्प संचालक घोडके यांना सविस्तर अहवाल सादर केल्यानंतर व्यापाऱ्यांचे कोणतेही नुकसान न होवू देता पालखी चौक ते सुमित्रा पतसंस्था पर्यंतचा सर्व्हिस रोड तातडीने पुर्ण केला जाईल. व्यापाऱ्यांनी व जागा मालकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रकल्प संचालक घोडके यांनी केले. 

घोडके म्हणाले, मोहोळ ते धर्मपुरी या सुमारे ११७ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गापैकी वेळापूर येथील केवळ दिड किलोमीटरचे काम रखडले आहे. वेळापूर येथील भूसंपादन व सर्व शासकीय कागदपत्रांची पूर्तता करुन राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने डिसेंबर २०२१ अखेर सर्व नुकसान भरपाईची रक्कम प्रांत कार्यालय अकलूजकडे जमा केली आहे. जागा मालकांनी नुकसान भरपाई संदर्भात प्रांत कार्यालयाशी संपर्क साधावा. 

मार्च २०२२ अखेर सदर राष्ट्रीय महामार्ग पुर्ण होणे अपेक्षित होते. परंतु कोरोना व जागा मालकाच्या अडचणी तसेच महामार्गावर असणारे थोर महापुरुषांचे पुतळे काढण्यासाठी डिसेंबर २०२२ पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. वेळापूर ग्रामस्थांच्या मागणीनुसार वेळापूरमध्ये पालखी चौक व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर १२ बाय ४ मिटर लांबीचे दोन बोगदे ठेवले आहेत. येत्या दोन महिन्यात पालखी महामार्ग पुर्ण करण्याची मुदत संपेल. त्यापूर्वी महामार्गाचे काम पुर्ण करण्याचे असल्याने जागा मालकांनी सहकार्य करावे. रस्त्यावरील अडचणी दूर झाल्या नाही तर सर्व्हिस रोड होणार नाही, असेही घोडके म्हणाले. 

यावेळी एस. एम. अवताडे कंपनीचे शुभम जाधव, भाजप तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख, मळोलीचे सत्यजित जाधव, नितीन चौगुले, भैय्यासाहेब कोडग, रिपाईचे तालुकाध्यक्ष मिलींद सरतापे. पै. तानाजी माने देशमुख, अनिल घाडगे, अरुण सावंत, जावेद आतार, संतोष आडगळे, औदुंबर भिसे, बाबा देवकते, अमृतराव शिंदे, प्रवीण शहा, जगदीश कुलकर्णी, राजेश पोडवाल यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button