Uncategorizedताज्या बातम्या

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील भाविकांना परतीचे वेध लागले तर ग्रामपंचायत नगरपंचायत यांना खर्चाचे वेध लागले

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी ग्रामपंचायत व नगरपंचायत यांना भाविकांच्या सुख सोयीसाठी आलेल्या खर्चाचा लेखाजोखा चावडी वाचन करावे.

माळशिरस ( बारामती झटका )

कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ संत शिरोमणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक पालख्या पायी वारीतील आषाढी एकादशी करून परतीच्या प्रवासाचा अंतिम टप्पा आलेला भाविकभक्तांना परतीचे वेध लागलेले आहेत, तर दोन्ही पालखी महामार्गावरील ग्रामपंचायत व नगरपंचायत यांना पालखीसाठी आलेला निधी कसा खर्च करावयाचा याचे वेध लागले आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी ग्रामपंचायत व नगरपंचायत यांना भाविकांच्या सुख सोयीसाठी वेगवेगळा निधी येत असतो. त्यामध्ये विसावा मुक्काम, रिंगण सोहळा यासाठी वेगवेगळे लाखो रुपयांचे निधी शासनाकडून दिला जातो. सदरचा खर्च कसा केला, याचा लेखा जोखा चावडी वाचन करून करावे, असे सर्व सामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना संसर्ग रोगाचे थैमान असल्याने पायी चालत पालखी सोहळा रद्द करून पालखी सोहळ्याची परंपरा बंद केलेली नव्हती. शिवशाही बसमधून पालखी सोहळा केलेला होता. यंदाच्या वर्षी कोरोना आटोक्यात असल्याने शासनाने अनादी कालापासून चालत आलेला पायी पालखी सोहळ्यास परवानगी दिलेली होती. दोन वर्ष खंडित झालेले असल्याने अनेक भाविक भक्तांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम या सर्वांनी प्रशासनाचे योग्य नियोजन केलेले असल्याने पालखी सोहळा विना विघ्न व भक्तिमय वातावरणात आनंदाने पार पडला असून परतीच्या प्रवासात असून अंतिम टप्प्यात पालखी सोहळे आलेले आहेत.

माळशिरस तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे धर्मपुरी, कारंडे पासून दसुरपर्यंत माळशिरस तालुक्यात प्रवास असतो तर श्री संत तुकाराम महाराज यांचा अकलूज, माळीनगर पासून तोंडले बोंडले पर्यंत येऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या मार्गाने पंढरपूर तालुक्यात प्रवेश करते.

दोन्ही पालख्यांच्या वेगवेगळ्या गावांमध्ये विसावा, गोल व उभे रिंगण आणि मुक्काम असतात. ज्ञानेश्वर महाराजांचे तीन मुक्काम व तीन गोल रिंगण सोहळे असतात. तुकाराम महाराज यांचे दोन मुक्काम, एक गोल रिंगण व एक उभे रिंगण सोहळे असतात अनेक ठिकाणी विसावा असतो.

दोन्ही पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविक भक्तांची व स्थानिक नागरिकांची पालखीच्या ठिकाणी गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने लाखो रुपये निधीची तरतूद केलेली असते. त्यामधून मुरूम, स्वच्छता, पाणी व इतर सुख सुविधा करण्याकरता निधी दिला जातो. सध्या माळशिरस तालुक्यात नातेपुते, माळशिरस व महाळुंग श्रीपूर या नगरपंचायत आहेत तर अकलूज नगर परिषद आहे, उर्वरित सर्व ग्रामपंचायत आहे.

गेल्या दोन वर्षापासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी कामे अंतिम टप्प्यात आहेत तर काही ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे दोन्ही मार्गावरील ठेकेदार यांनी जागोजागी मुरूम टाकून ग्रामपंचायत व नगरपंचायत यांना भाविकांच्या सोयीसाठी सहकार्य केलेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व नगरपंचायत आलेला निधी खर्च कसा करतात, याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. प्रत्यक्षात मुरूम किती टाकला आणि खर्चात किती धरला जातो. बऱ्याच ठिकाणी “पाचाच पन्नास हेल मांडला जाऊ दे”, असा प्रकार होणार आहे. दोन्ही पालखी सोहळ्यासाठी ग्रामपंचायत व नगरपंचायत यांनी भाविकांच्या सुख सोयीसाठी आलेल्या खर्चाचा लेखाजोखा चावडी वाचन करावे आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा.

पालखी महामार्गावरील सामाजिक कार्यकर्ते यांनीही या खर्चाविषयी लक्ष घालण्याची गरज आहे. अनेक ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांचा पालखी महामार्गाच्या निधीवर डोळा ठेवून आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी, गटविकास अधिकारी विनायक गुळवे व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी या गोष्टीकडे बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button