श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील प्लेटचा उड्डाणपूलाचे काम सदाशिवनगर पुरंदावडे ग्रामस्थांनी रोखले.
उड्डाणपूल संघर्ष समिती व पुरंदावडे सदाशिवनगर ग्रामस्थांचा जे. एम. म्हात्रे इन्फ्रा कंपनीस निर्वानीचा इशारा, निर्णय होईपर्यंत काम बंद ठेवा, अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल.
सदाशिवनगर ( बारामती झटका )
उड्डाणपूल संघर्ष समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते सूर्यकांत उर्फ पोपटदादा गरगडे व सदाशिवनगर पुरंदावडे येथील आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी जे. एम. म्हात्रे इन्फ्रा कंपनी, पनवेल या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर यांना सदाशिवनगर पुरंदावडे गावातून जाणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक 965 वरील उड्डाणपुलाचे काम बंद ठेवण्याचे निवेदन देण्यात आलेले आहे.

निवेदन देऊन कंपनीस निर्वाणीचा इशारा देण्यात आलेला आहे. निर्णय होईपर्यंत काम बंद ठेवा, अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असे निवेदन देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील प्लेटचा उड्डाणपूलाचे सदाशिवनगर पुरंदावडे ग्रामस्थांनी काम रोखले आहे.

सदर दिलेल्या निवेदनामध्ये पुरंदावडे सदाशिवनगर ग्रामपंचायतच्या हद्दीतून प्लेटचा उड्डाणपूल जात आहे. यामुळे दोन्ही गावाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. जर प्लेटचा उड्डाणपूल झाला, तर सर्व व्यापारी वर्गाचे गावातील रहिवाशांचे अतोनात नुकसान होणार आहे. कारण सदाशिवनगर पुरंदावडे गाव हे ज्यादा प्रमाणात रोडच्या कडेला वसलेले असून त्या ठिकाणी साखर कारखाना, अंगणवाडी ते बारावीपर्यंत शाळा आहेत.
जर प्लेटचा उड्डाणपूल झाला तर कारखाना चालू सीझनमध्ये बैलगाडी, घंटागाडी, ट्रॅक्टर व ट्रक मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक करत असतात त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. तसेच साखर कारखाना व मोठी शाळा असल्यामुळे परिसरातील दहा ते पंधरा गावातील शेतकरी सदाशिवनगर पुरंदावडे या ठिकाणी येत असतात.
तरी स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी वर्ग या सर्वांची एकच मागणी आहे की, प्लेटचा उड्डाणपूल रद्द करून कॉलमचा उड्डाणपूल करण्यात यावा, ही विनंती. नाही तर ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने दि. 23/7/2022 रोजी रास्ता रोको करण्यात येणार आहे. अशा आशयाचे पत्र उड्डाणपूल संघर्ष समिती ग्रामपंचायत सदाशिवनगर व पुरंदावडे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर प्रकल्प संचालक एन. एच. आय. पंढरपूर उपविभागीय अधिकारी, अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज यांना निवेदन दिले आहे. तरी याचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत आपण उड्डाणपूलाचे काम उद्यापासून बंद ठेवावे ही विनंती. जर काम चालू राहिले तर दोन्ही गावातील ग्रामस्थ, व्यापारी, शेतकरी यांच्या उद्रेकास आपण जबाबदार रहाल अशा आशयाचे निवेदन देण्यात आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
