संत गाडगेबाबा विद्यालय गुणवत्तेबरोबरच शालेय व सहशालेय उपक्रमात अग्रेसर – केंद्रप्रमुख रोहिदास कापसे
राजभाषा हिंदी प्रचार स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण
माढा (बारामती झटका) राजेंद्र गुंड यांजकडून
माढा तालुक्यातील श्री विठ्ठल ज्ञानपीठ निमगाव (टें.) संचलित, कापसेवाडी हटकरवाडी येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय हे विविध परीक्षेतील शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी आणि विशेष दिनांचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय व सहशालेय उपक्रम राबविण्यात तालुक्यात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मानेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रोहिदास कापसे यांनी काढले आहेत. ते महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करताना बोलत होते.

यावेळी प्रास्ताविक सहशिक्षक सुनील खोत यांनी केले. हिंदी राष्ट्रभाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयाचे एकूण 91 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 80 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 11 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. लहान गटात प्रथम क्रमांक मोरेश्वर बगडे याने व मोठ्या गटात प्रथम क्रमांक प्रांजली पवार हिने पटकावला आहे. या दोघांनाही राष्ट्रीय राजभाषा हिंदी गौरवरत्न पुरस्कार मिळाला असून त्यांना केंद्रप्रमुख रोहिदास कापसे यांच्या हस्ते गोल्डमेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय राजभाषारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी हा उपक्रम राबविणारे सहशिक्षक सुनील खोत व मुख्याध्यापक प्रवीण लटके यांना देखील प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक प्रवीण लटके, तुकाराम कापसे, शिवाजी भोगे, तनुजा तांबोळी, सचीन क्षीरसागर, सुधीर टोणगे, लहू गवळी, सागर राजगुरू यांच्यासह प्रशालेतील पाचवी ते दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आ. बबनदादा शिंदे, आ. संजयमामा शिंदे, चेअरमन रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, सचिव प्रणिता शिंदे, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng