बोरगाव येथील विविध विकास कामांची चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा आम आदमी पार्टीचा गटविकास अधिकारी यांना इशारा.
माळशिरस( बारामती झटका)
मौजे बोरगाव ता. माळशिरस या गावातील रस्त्यांची, गटारांची अतिशय दुरावस्था झाली असून रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना रहदारी करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात बोरगाव गावचे ग्रामस्थ वैभव कोळी व इतर ग्रामस्थांनी या अगोदर बोरगावचे ग्रामसेवक यांना सतत तोंडी व अर्ज करूनही अजूनपर्यंत कोणतीच दखल घेण्यात आली नाही.
सदर ग्रामस्थांनी याबाबत आम आदमी पार्टी माळशिरस तालुका कार्यकारिणी यांना तोंडी स्वरुपात तक्रार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांच्याकडे केली आहे.
बोरगाव गावामध्ये विकास निधी येतो आहे. पण तो फक्त कागदोपत्री खर्च केला जातो, असे भासत आहे. आपण स्वतः गाव नकाशातील रस्ते, दिवाबत्तीची सोय, झालेल्या कामाचा दर्जा, गावात आलेला सर्व निधी या सर्वांची तपासणी करावी. जिथे रस्त्यांची गरज आहे, अशा ठिकाणी रस्ते का केले नाहीत, याचीपण चौकशी होणे आवश्यक आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगावकडे जाणाऱ्या रोडची तर अतिशय दयनीय अवस्था असताना ही जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात तर या रोडची अवस्था अतिशय हलाखीची होते. रुग्णांना आरोग्य केंद्रात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.
बोरगाव ग्रामपंचायतमध्ये २०२० पासून झालेल्या कामांची वर्क ऑर्डर मागवून ती कामे झालीत का ? झाली असतील तर त्याचा दर्जा काय ? याची पण तपासणी करावी, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. सर्व मुद्दावर त्वरित पुढील योग्य कार्यवाही करावी. जर योग्य ती कार्यवाही करण्यास विलंब केल्यास तसेच निवेदनाची दखल त्वरित न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.

यावेळी आम आदमी पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष संदिप इंगोले, तालुका संघटक ॲड. मनोजकुमार सुरवसे, तालुका पक्ष प्रवक्ता विनायक सावंत, तालुका कायदेतज्ञ ॲड. स्वाती काकडे, उमेश राऊत, बोरगाव शाखा अध्यक्ष वैभव कोळी आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng