माळेगाव कारखान्याचा पहिला निकाल अजितदादांच्या बाजूने, ब प्रवर्गात ९१ मते मिळवत विजयी

बारामती (बारामती झटका) सकाळ साभार
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिला निकाल जाहीर झाला असून ब वर्ग सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. अजितदादा पवार यांना ९१ तर त्यांच्या विरोधी उमेदवाराला १० मते पडली आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चौरंगी लढत झाली होती. आज या निवडणुकीची मतमोजणी बारामतीतील प्रशासकीय भवन मधील अभियांत्रिकी भवन येथे सुरू झाली आहे. सर्वात पहिला निकाल हा अजितदादा पवार यांच्या पॅनलच्या बाजूने जाहीर झाला आहे. या जागेवर अजितदादा पवार विजयी होणार हे निर्विवाद होते, त्यामुळे ही जागा सोडून इतर जागांसाठी प्रचार झाला होता.
आजच्या या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांचे निळकंठेश्वर पॅनल विरुद्ध चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनलमध्ये मुख्य लढत होणार आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कोणाला कल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या निवडणुकीमध्ये उडी मारली असून त्यांनी निळकंठेश्वर पॅनलचा विजय झाल्यास आपणच या कारखान्याचे अध्यक्ष होणार असल्याची घोषणा केल्यामुळे या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
माळेगावचे सभासद कोणाच्या बाजूने कौल देतात, हे येत्या काही तासात समोर येईल. दरम्यान मतमोजणी केंद्रावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून पारदर्शकपणे मतमोजणी व्हावी यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



