सहकार व शेतकरी संघटनेचे धुरंदर नेते प्रल्हाद पाटील कराड यांच्या निधनाने चळवळ पोरकी झाली – कुबेर जाधव, समन्नवयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना
निफाड (बारामती झटका)
सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष,१९८० च्या दशकातील शेतकरी संघटनेच्या उस आणि कांद्याच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे तिन मोहऱ्यापैकी एक असलेले, धूरंधर नेते म्हणून लाखो शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनुन मैदानात उतरुन कै. शरद जोशी, माधवराव खंडेराव मोरे, तत्कालीन निफाड कारखान्याचे अध्यक्ष माधवराव बोरस्ते या त्रिमूर्ती बरोबर खांद्याला खांदा लावुन लढणारे, शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील सहकार चळवळीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात चार मुले आहेत.
निफाड तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटविलेले प्रल्हाद पाटील कराड हे ८० च्या दशकातील शेतकरी संघटनेच्या उस आणि कांद्याच्या आंदोलनात सहभागी होऊन लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे मोल आपल्या रांगड्या भाषेत समजुन सांगणारी मुलुख मैदानी तोफ म्हणून नावलौकिक असलेले प्रल्हाद पाटील कराड यांच्या जाण्याने संघटनेतील एक तारा निखळला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अत्यंत संवेदनशील व मनमिळाऊ स्वभावाचे असलेले प्रल्हाद पाटील कराड जेव्हा शेती मालाला रास्त भाव मिळावा म्हणून राज्यकर्त्यांवर असुड ओढत होते तेव्हा, त्यांच्या समोर बसलेले हजारो शेतकरी मंत्रमुग्ध होत होते. त्यांच्या जाण्याने नाशिक जिल्ह्यातील विशेषतः निफाड तालुक्यातील सहकार चळवळ पोरकी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. – कुबेर जाधव, समन्नवयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng