पहिल्यांदाच खासदार, अन् सरळ मोदींच्या मंत्रिमंडळात, मुरलीधर मोहोळ यांची राजकीय भरारी…

पुणे (बारामती झटका)
पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यांचा मोदी ३ मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.
मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळाले आहे. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढवणे आणि मराठा समाजातील नेत्यास संधी देणे ही भूमिका ठेऊन पहिल्यांदा खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची चांगली कामगिरी झाली. त्यामुळे त्या ठिकाणी भाजप भक्कम करण्याची जबाबदारी मोहोळ यांना करावी लागली आणि ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली आहे.
लोकसभा निवडणुकीत पुणे मतदार संघातून मुरलीधर मोहोळ हे प्रथमच खासदार झाले आणि पहिल्याच टर्ममध्ये त्यांना केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी लागली. पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी १९९५-९६ या काळात रेल्वे राज्यमंत्री होते. त्यानंतर २८ वर्षांनी पुण्यातून निवडून गेलेली व्यक्ती केंद्रात मंत्री होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण पुण्यातून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या शपथविधी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते दिल्लीला गेले होते. मंत्रीपद मिळाल्याबद्दल आज खासदार मुरलीधर मोहोळ यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
खासदार मुरलीधर मोहोळ मूळचे मुठा, ता. मुळशी, या गावचे. कोल्हापुरात त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत त्यांनी प्रवेश केला. भाजपचे वार्ड अध्यक्ष म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष, शहर भाजप सरचिटणीस, पुणे महापालिका शिक्षण मंडळ सदस्य (२००२), महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक (२००७, २०१२, २०१७), महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष पद (२०१७-१८) त्यांनी भूषवले. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक म्हणून (२०१७-१८) त्यांनी काम केले. २०१९-२२ ते पुण्याचे महापौर होते. अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. पीएमपीएमएल संचालक, पीएमआरडीए सभासद होते. त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये निवडणूक लढवली होती. भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे. यंदा प्रथमच त्यांना पुण्याचे खासदार होण्याचा मान मिळाला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.