Uncategorized

स्वकर्तुत्वाने उद्योग व्यवसायात प्रगती करून गावात पहिल्यांदा फॉर्च्यूनर घेण्याचा बहुमान मिळवलेला

अल्पभूधारक शेतकऱ्याने प्रतिकूल परिस्थितीत कष्टातून संसार करून मुलांना शिक्षण दिले, मुलांनी आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले.

मळोली ( बारामती झटका )

मळोली ता. माळशिरस येथील अल्पभूधारक शेतकरी हरिदास परमानंद जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत कष्टातून संसार करून मुलांना शिक्षण दिले. मुलांनी आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करून स्वकर्तुत्वाने उद्योग व्यवसायात प्रगती करून फ्लोरा फर्निचर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योजक मोहित शेठ हरिदास जाधव यांनी गावात पहिल्यांदा फॉर्च्यूनर घेण्याचा बहुमान मिळविलेला आहे. तालुक्यात अनेकांनी आपल्या वडीलोपार्जीत जमिनी, जागा विकून व श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गात संपादन जमिनीच्या मिळालेल्या पैशातून मोठमोठ्या गाड्या घेतलेल्या आहेत. स्वकर्तुत्वाने जिद्द, चिकाटी, अफाट कष्ट व मेहनत करून प्रगती केल्याने अशा युवकाचा अभिमान आहे.

मळोली गावात सर्वसामान्य व शेतकरी सांप्रदायिक कुटुंब असणारे जानकाबाई व परमानंद कोंडीबा जाधव. त्यांना हनुमंत, हरिदास, वासुदेव, नामदेव अशी चार मुले आणि सिंधुताई व शकुंतला अशा दोन मुली. दहा गुंठे मळा व पाच एकर खोकड पळी शेती होती, त्यावर संपूर्ण परिवाराची गुजराण चालू होती. परमानंद तात्या यांना उत्कृष्ट मृदुंग वाजवायला येत होता. संपूर्ण परिवार सांप्रदाय शुद्ध आचार विचार घरामध्ये पहिल्यापासून रुजलेला होता. चार भावंडांमधील काहींना गरीब परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागलेले होते.

हरिदास जाधव यांनी दहावीपर्यंत जनता विद्यालय मळोली येथे शिक्षण पूर्ण केले. आर्थिक परिस्थिती नसल्याने पुढील शिक्षण घेऊ शकले नाही. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. शेती व दुग्ध व्यवसायाला आर्थिक उत्पन्नासाठी नोकरीची आवश्यकता असल्याने शिवामृत दूध संघाकडे सुपरवायझर म्हणून सहा वर्ष काम केले. त्यानंतर मळोली विविध कार्यकारी सेवा सोसायटी येथे लोकनेते स्व. जयसिंगराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्ष क्लार्क म्हणून काम पाहिले. 1989 साली गावातीलच रामहरी भोसले यांची कन्या सुमनबाई यांच्याशी विवाह झालेला होता. दोघा पती-पत्नीने जोमाने संसाराला सुरुवात केली. शेती, दुग्ध व्यवसायाबरोबर 1995 ते 2005 या दशकामध्ये यारी घेऊन अनेकांच्या विहिरी फोडण्याचे काम केलेले होते. वेळप्रसंगी कामगारांची कमतरता असल्यानंतर स्वतः कपडे काढून यारीवर काम केले होते. 1993 साली चांगदेव कदम यांची राजदूत गाडी एमएचजे 9935 खरेदी केली होती.

सौ. सुमन व श्री. हरिदास यांना मोहित व निलेश दोन मुले आहेत. मोहित यांचे पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळोली येथे शिक्षण झालेले आहे. पाचवी ते दहावी जनता विद्यालय मळोली येथे शिक्षण झालेले आहे. अकरावी ते बारावी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय माळेवाडी, अकलूज येथे झाले आहे तर शिवाजी पॉलिटेक्निकल कॉलेज येथे डिप्लोमा पूर्ण केलेला आहे‌. डिग्री नवसह्याद्री इंजिनिअरिंग कॉलेज भोर पुणे येथे पूर्ण केली आहे. 2015-16 साली मोहित यांनी बी. ई. मेकॅनिकल पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नसरापूर, पुणे येथील रावत फर्निचर येथे ऑपरेटर म्हणून सुरुवात केली. नंतर प्रोडक्शन मॅनेजर म्हणून बढती मिळालेली होती. चार वर्ष त्या ठिकाणी काम केले. त्यानंतर बारामती येथील फर्निचर कंपनीत पाच वर्ष फॅक्टरी मॅनेजर म्हणून काम पाहिले.

2018 साली अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जननायक मामासाहेब पांढरे, माळशिरस पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, अतुल उद्योग समूहाचे उद्योजक अतुल शेठ बावकर, युवा उद्योजक संतोषआबा वाघमोडे पाटील, युवा नेते रणजीतदादा काळे यांच्या सहकार्याने फ्लोरा फर्निचर शोरूमची सुरुवात केली. 2019 मध्ये फ्लोरा फर्निचर उद्योग समूहाची सुरुवात दहिगाव रोड येथे काळे यांच्या भाडोत्री जागेत केली. नातेपुते उद्योग व्यवसायामध्ये सुपरिचित आहे. अशा गावामध्ये मोहित शेठ यांनी उत्कृष्ट प्रकारे उद्योग व्यवसाय करून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. दिवसेंदिवस उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत चालली. त्यांना वडील हरिदास व बंधू निलेश यांची मोलाची साथ मिळत आहे.

मोहितशेठ यांचा तासगाव तालुक्यातील पुनदी गावातील तानाजीराव चव्हाण पाटील यांची कन्या मेघा यांच्याशी विवाह झाल्यानंतर उद्योग व्यवसायामध्ये आणखीन भरभराट आलेली आहे. थोड्याच दिवसांमध्ये नातेपुते शहरात भव्य उद्योग व्यवसाय उभारण्याकरता वीस गुंठे जागा खरेदी केलेली आहे. पूर्वीची इनोव्हा गाडी विकून नवीन फॉर्च्यूनर गाडी घेतलेली आहे. बारामती येथे नवीन फॉर्च्यूनर गाडी घेत असताना माऊली पाटील, संतोष आबा वाघमारे पाटील, पप्पू दुधाळ, नवनाथ जाधव उपस्थित होते.

मळोली गावामध्ये पूजा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते मुकुंदराव जाधव, माळशिरस पंचायत समितीचे पक्षनेते रणजीतसिंह जाधव, मनोज दादा जाधव, मनोजबाप्पा जाधव, सत्यजित जाधव, गणेश जाधव पाटील, राजेंद्र जाधव पाटील, विलासदादा जाधव, प्रभाकर इंगळे सर देशमुख, शिवाजीराजे भोसले, संजय गुजर, दीपकराव जाधव आदी उपस्थित होते.

मळोली गावचे माजी सरपंच स्व. भगवानराव परशुराम जाधव यांची नात व श्री. मुकुंदराव भगवानराव जाधव यांची भाची सौ. मेघा असल्यामुळे नवीन गाडीची पूजा करीत असताना श्री. हरिदास जाधव यांना नवीन कपड्याचा आहेर करण्यात आला. यावेळी मोहितशेठ जाधव व निलेश जाधव उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button