आ. बबनदादा शिंदे यांचेकडून सीना नदीवरील खैराव-कुंभेज येथील पुलाची पाहणी
निर्धारित वेळेत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या अधिका-यांना दिल्या सूचना
माढा (बारामती झटका) राजेंद्र गुंड यांजकडून
माढा मतदारसंघाचे विकासपुरूष आमदार बबनदादा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून सन 2020 मधील महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात माढा तालुक्यातील सीना नदीवरील खैराव-कुंभेज येथील मोठ्या पुलाच्या कामासाठी 15 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला होता. त्या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. या पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आ. बबनदादा शिंदे यांनी खैराव येथे भेट देऊ केली. यावेळी संबंधीत ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना पुलाचे काम निर्धारित वेळेत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
यावेळी आ. बबनदादा शिंदे यांनी सांगितले की, हा पुल माढा, बार्शी व मोहोळ तालुक्यासाठी उपयुक्त असून 160 मीटर लांबीचा असून एकूण 7 गाळे आहेत. हा पुल प्रमुख जिल्हा मार्ग 33 वरती असून यामुळे माढा तालुक्यातील मानेगाव, खैराव, कुंभेज, धानोरे, बुद्रुकवाडी, अंजनगाव खेलोबा व मोहोळ तालुक्यातील वाफळे, देवडी, खंडाळी, आष्टी आणि बार्शी तालुक्यातील यावली प्रमुख जिल्हा मार्ग 25 ला जोडणारा दुवा आहे. परंतु, मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी पुल नसल्याने वाहतूक मार्ग मध्येच खंडित होत होता. परिणामी शेतकरी, विद्यार्थी, महिला व नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. हे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्यातून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या शेकडो वारकऱ्यांना व पायी दिंड्यांना याचा फायदा होणार असून जवळपास 30 ते 35 किलोमीटर एवढे अंतर कमी होणार आहे. ऊस वाहतूकीसाठीही या पुलाचा उपयोग होणार आहे. जनतेची मागणी लवकरच पूर्णत्वास येणार असून गैरसोय कायमस्वरूपी दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मार्केट कमितीचे उपसभापती सुहास पाटील, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक निलकंठ पाटील, संदीप पाटील, उपविभागीय अभियंता नजीरहुसेन नाईकवाडी, सहाय्यक अभियंता आनंद नाझरे, प्राचार्य सुभाष नागटिळक, कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख, चेअरमन शिवशंकर गवळी, तानाजी देशमुख, कृषीनिष्ठ नितीन कापसे, उपसरपंच मदन आलदर, चेअरमन विलास कदम, दिपक भोसले, पंडित पाटील, चेअरमन रमाकांत कुलकर्णी, औदुंबर देशमुख, शरद नागटिळक, पिंटू नागटिळक, आ. शिंदे यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र शिंदे, नितीन मराठे, बापूराव शेळके, महेश नागटिळक यांच्यासह मानेगाव, खैराव, कुंभेज, धानोरे, कापसेवाडी, बुद्रुकवाडी, हटकरवाडी येथील ग्रामस्थ, शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng