प्रेरणादायी बातमी : सार्वजनिक बांधकाम मंडळाचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार गोविंद कर्णवर पाटील यांना मिळाला.
अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता पदावर कार्यरत असणारे कर्णवर पाटील यांना उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित केले
उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त आदर्श अभियंता गोविंद कर्णवर पाटील यांचा मित्र परिवाराच्या वतीने सन्मान संपन्न
माळशिरस ( बारामती झटका )
भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जन्मदिनानिमित्त भारतभर अभियंता दिवस अभिमानाने साजरा केला जातो. शासकीय सेवा बजावताना केलेल्या उल्लेखनीय कामकाजाची दखल कामातील निष्ठा, शिस्त, सामाजिक सहकार्य व जनतेचे सहकारी अशा सर्व गुणसंपन्न असणाऱ्या प्रशासनातील कार्यरत असणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांचा सन्मान केला जातो. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूर यांच्या वतीने गोरडवाडी गावचे थोर सुपुत्र व सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज येथे शाखा अभियंता पदावर कार्यरत असणारे श्री. गोविंद मल्हारी कर्णवर पाटील यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त व आदर्श शाखा अभियंता गोविंद कर्णवर पाटील यांचा मित्र परिवारांच्या वतीने माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे सन्मान संपन्न झाला.
यावेळी गोरडवाडी गावचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड, विचारवंत प्रा. दादासाहेब हुलगे सर, श्री. जगन्नाथ गोरड सर, श्री. नाथाप्पा गोरड सर, श्री. आबासाहेब पिंगळे सर, जहांगीर शिकलगार, उद्योजक महादेव यमगर, युवा नेते विकास देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
गोरडवाडी येथील श्री मल्हारी कर्णवर पाटील व सजाबाई सर्वसामान्य शेतकरी व मेंढपाळ कुटुंब. यांना भागवत, शशिकांत आणि गोविंद अशी तीन मुले आहेत. गोविंद यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरडवाडी येथे पहिली ते सातवी पर्यंत झालेले आहे. आठवी ते दहावी गीताई प्रशाला मोटेवस्ती येथे झालेली आहे. अकरावी ते बारावी गोपाळराव देव प्रशाला माळशिरस येथे झालेले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे अभियांत्रिकी शिक्षण 2010 साली पूर्ण केलेले होते.
सुरुवातीस श्रीराम शिक्षण संस्था या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजवर लेक्चरर म्हणून तीन वर्ष काम केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नोकरीस सुरुवात केली. सुरुवातीस कनिष्ठ अभियंता पदावर तुळजापूर व परांडा येथे सेवा बजावलेली आहे. त्यांची अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागात बदली होऊन शाखा अभियंता पदावर बढती झालेली होती. 2019 सालामध्ये अकलूज येथे कार्यरत असताना उल्लेखनीय कार्य करून उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्राप्त केलेला आहे.
कर्णवर पाटील यांचे गोरडवाडी गावामध्ये सामाजिक, राजकीय व कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आहे. मल्हारी बाबाजी कर्णवर पाटील हे पोलीस पाटील होते. सौ. मंगल भागवत पाटील यांनी गावच्या सरपंच पदाची धुरा सांभाळलेली होती. भागवत कर्णवर पाटील यांच्याकडे गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची चेअरमन पदाची धुरा होती.
एकाच वेळी घरामध्ये पोलीस पाटील, गावचे सरपंच व सोसायटीचे चेअरमन असण्याचे एकमेव उदाहरण आहे. आणि त्याच वर्षी गोविंद कर्णवर यांना कनिष्ठ पदावरून शाखा अभियंता पदावर बढती मिळालेली होती.
गोविंद कर्णवर पाटील यांनी शिक्षित असून सुद्धा समाजाशी नाळ तुटू दिलेली नव्हती. त्यांनी दि. 26/11/2012 रोजी सामुदायिक विवाहामध्ये गोरडवाडी येथील तुकाराम हुलगे यांची कन्या वैशाली यांच्याशी विवाह केलेला होता. त्यांना सध्या अविराज व कार्तिक अशी दोन मुले आहेत.
2020 साली कर्णवर पाटील यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. मातोश्री सजाबाई यांचे दुःखद निधन झालेले होते. स्व. सजाबाई यांनी घरामध्ये घालून दिलेला आदर्श, सुसंस्कृतपणा यावर कर्णवर परिवारांची वाटचाल सुरू आहे. स्व. सजाबाई यांच्या पुण्यस्मरणाला रक्तदानसारखा श्रेष्ठ उपक्रम राबवत असतात.
कायम समाजसेवा व राजकारणामध्ये अग्रेसर असणार्या कुटुंबामधील गोविंद कर्णवर पाटील यांनी प्रशासनातही उल्लेखनीय काम करून कर्णवर पाटील घराण्यामध्ये व गावच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलेला आहे. उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाल्यापासून कर्णवर पाटील यांचा अनेक स्तरातून सन्मान होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng