लोन ॲपद्वारे लूट, टोळीला ‘मोक्का’
१०० गुंड टोळ्या, ६७० जणांवर कारवाई
पुणे (बारामती झटका) लोकमत साभार
लोन ॲपद्वारे खंडणी स्वीकारून फसवणूक केलेल्या टोळी विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोन ॲप टोळीवर पहिल्यांदाच मोक्का लावण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षात पुणे पोलिसांनी शहरातील १०० टोळ्यांविरोधात मोक्का नुसार कारवाई केली असून मोक्का कारवाईमुळे शहरातील संघटित गुन्हेगारीला चाप बसला आहे.
लोन ॲपच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचे गुन्हे दाखल झाले होते. अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या चोरट्यांच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या टोळी विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोन ॲप प्रकरणात मोक्का कारवाईचा प्रस्ताव सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांनी सादर केला. त्यानुसार धीरज भारत पुणेकर (रा. कुमठा नाका, सोलापूर), स्वप्नील हनुमंत नागटिळक (रा. पापारामनगर, सोलापूर), श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड (रा. भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर), प्रमोद जेम्स रणसिंग (कुमठा नाका, सोलापूर), सॅम्युअल संपत कुमार, सय्यद अकीब पाशा, मुबारक अफरोज बेग, मुजिब बरांद कंदीयल इब्राहिम, मोहम्मद मनियम पिता मोहिदु (सर्व रा. बंगळुरू, कर्नाटक) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.
६७० गुंडांवर मोक्का
गेल्या दीड वर्षात शहरातील १०० गुंड टोळ्यांमधील ६७० सराईतांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा घालणे, दारूबंदी, अमली पदार्थ विक्री, लोन ॲप फसवणूक अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng