पुरंदावडे येथील अजय उर्फ नानासो राऊत सर यांचे दुःखद निधन.
सरपंच, ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करणारे व राऊत परिवार यांचा तारणहार हरपला.
पुरंदावडे ( बारामती झटका )
पुरंदावडे ता. माळशिरस येथील अजय उर्फ नानासो यशवंत राऊत सर यांचे वयाच्या ४१ वर्षी मंगळवार दि. ११/१०/२०२२ रोजी सकाळी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात आजी, आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, भाऊजय व तीन चुलते असा परिवार आहे. त्यांच्यावर पुरंदावडे गावठाण मेडद रोड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये दुपारी ३.४५ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. अंत्यसंस्कार प्रसंगी माळशिरस पंचायत समिती मधील अधिकारी, कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामसेविका, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच पुरंदावडे पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजय उर्फ नानासो राऊत यांचे गेली दहा ते पंधरा वर्षे एमजीएम संस्थेच्या माध्यमातून नूतन सरपंच, उपसरपंच व प्रशासनातील ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू होते. ग्रामविकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम व विकासकामे याचे सर्व मार्गदर्शन महाराष्ट्रातील ग्रामसेवक यांना देण्याचे काम सुरू होते. सरपंच व उपसरपंच यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये प्रविण प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेकवेळा काम पाहिले आहे. चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या निधीचे नियोजन कसे करावे, याचे मार्गदर्शन व सल्ला ग्रामसेवकांना देण्याचे काम सुरू होते. ग्रामसेवक यांना योग्य मार्गदर्शन असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार करीत असताना मोलाचे सहकार्य मिळत होते.
अजय राऊत सोलापूर येथे प्रशिक्षणासाठी गेलेले होते. रस्ता ओलांडत असताना वाहनाची धडक बसून एक महिन्यापूर्वी दि. १३/०९/२०२२ अपघात झालेला होता. सोलापूर येथे उपचार करून चार दिवसापूर्वी घरी आलेले होते. ग्रामसेवक यांच्याशी फोनवरून संपर्क सुरू होता. अनेकजण त्यांना घरी येऊन भेटलेले होते. आज सकाळी अचानक श्वास कमी पडल्यासारखे जाणवले, दवाखान्यात जात असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. राऊत सर यांना दोन लहान मुले आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे. गुरुवार दि. १३/१०/२०२२ रोजी सकाळी साडेसात वाजता रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना बारामती झटका परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng