हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होणे काळाची गरज – श्री सतिश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी माळशीरस
माळशिरस (बारामती झटका)
विविध हवामान बाबीमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते. अशा नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी फळपिक विमा संरक्षणाची गरज आहे. सन २०२२ -२३ मध्ये महसुल मंडलमध्ये डाळींब, केळी, द्राक्ष, आंबा, पपई या फळपिकांचे २० हे उत्पादनक्षम क्षेत्र असेल तर या फळपिकासाठी ते मंडळ अधिसुचित करण्यात येऊन त्या फळपिकासाठी शासनाने हवामान आधारित फळपिक विमा योजना लागू केली आहे. यामध्ये डाळींब २ वर्षे, आंबा ५ वर्षे, द्राक्ष २ वर्षे, पपई ९ महिने, केळी १.२५ वर्षे उत्पादनक्षम वय असणे आवश्यक आहे.
फळपिकांसाठी कुळाने, भाडेपट्टा व इतर सर्व शेतकरी यामध्ये बीगर कर्जदार यांना ऐच्छीक व कर्जदार शेतकरी यांना त्यांचे संमतीने स्वतः शेतकरी किंवा त्यांचे बँकेने फळपिक विमा पोर्टल वर WWW.PMFBY.GOV.IN वर मुदतीत जमा करायचा आहे. फळपीक धारक शेतकरी ४ हेक्टर मर्यादेपर्यत अधिसूचित मंडळमधील अधिसुचित १ किंवा जास्त पिकाचा विमा भरु शकतात. डाळींबसारख्या पिकाला मृग किंवा अंबिया बहार यापैकी एक हंगामासाठी विमा भरू शकतात. विमा भरणेसाठी वरील संकेत स्थळावर ७/१२, ८अ, पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, आधार, बँक पासबुक व फळबागेचा जिओ टॅगींग केलेल्या फोटोसह डाळींबसाठी – १४ जानेवारी, केळी व पपईसाठी ३१ ऑक्टोबर, द्राक्षसाठी १५ ऑक्टोबर व आंबासाठी – ३१ डिसेंबर पूर्वी विमा भरावयचा आहे.
फळ पिके हवामान धोके कालावधी – विमा संरक्षित रक्कम व भरावयाचा विमा हप्ता खालील प्रमाणे –
१) डाळींब पीक – अवेळी पाऊस – १५ जाने ते ३१ मे, जास्त तापमान – १ एप्रिल ते ३१ मे, गारपीट – १ जाने ते ३० एप्रिल या हवामान धोकेसाठी १,३०,००० विमा संरक्षणासाठी विमा हप्ता १३,००० रु. प्रति हेक्टर भरावयाचा आहे.
२ ) केळी पीक – कमी तापमान – १ नोव्हे ते २८ फेब्रुवारी, वेगाचा वारा – १ मार्च ते ३१ जुलै, जास्त तापमान – १ एप्रिल ते ३१ मे या हवामान धोकेसाठी १,४०,००० विमा संरक्षण असून ७००० रु. प्रति हेक्टर विमा भरावयाचा आहे. या पीकात गारपीठ – १ जाने ते ३० एप्रिल हवामान धोक्यासाठी ४६,६६७ विमा संरक्षण असून त्यासाठी २,३३३ अतिरिक्त विमा प्रति हेक्टर भरणे आहे.
३ ) द्राक्ष पीक – अवेळी पाऊस – १६ ऑक्टोबर ते ३० एप्रिल, कमी तापमान – १ डिसें ते २८ फेब्रुवारी या हवामान धोकेसाठी ३,२०,००० विमा संरक्षण असून १६,००० रु. प्रति हेक्टर विमा हप्ता भरावयाचा आहे. गारपीठ १ जाने ते ३१ मे कालावधीत हवामान धोकेसाठी १,०६,६६७ विमा संरक्षण असून यासाठी ५,३३३ विमा रक्कम प्रति हे. अतिरिक्त भरावयाची आहे.
४ ) आंबा पिक – अवेळी पाऊस – १ जाने ते ३१ मे, कमी तापमान – १ जाने ते २८ फेब्रुवारी, जास्त तापमान १ मार्च ते ३१ मार्च यासाठी १,४०,००० विमा संरक्षण असून त्यासाठी १०,५०० रु. प्रति हेक्टर विमा रक्कम भराक्याची आहे. गारपीट १ फेब्रुवारी ते ३१ मे कालावधी मधील हवामान धोकेसाठी ४६,६६७ विमा संरक्षण असून त्यासाठी २,३३३ अतिरिक्त विमा रक्कम प्रति हेक्टर भरावयाची आहे.
५ ) पपई पीक – कमी तापमान – १ नोव्हें ते ३० एप्रिल, वेगाचा वारा – १ फेब्रुवारी ३० जून, जास्त पाऊस व आर्द्रता – १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीमधील हवामान धोकेसाठी ३५,००० विमा संरक्षण असून त्यासाठी १,७५० रु. विमा हप्ता करावयाचा आहे. गारपीट – १ जाने ते ३० एप्रिल या हवामान धोक्यासाठी ११,६६७ विमा संरक्षण असून त्यासाठी प्रति हेक्टर ५८३ रु. अतिरिक्त हप्ता भरणे आहे.
प्रत्येक महसुल मंडळमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वीत आहे. याचे हवामान बाबी विश्लेषण होऊन पीक निहाय हवामान धोके कार्यान्वीत झालेवर विमा रक्कम विमा कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने संबंधीत लाभार्थी शेतकरी यांच्या खातेवर विमा कंपनी जमा करते. गारपीट व वेगाचा वारा यामुळे नुकसान झाल्यास ७२ तासाच्या आत विमा कंपनी प्रतिनिधी किंवा टोल फ्री नंबर १८०० ३००९ रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी वर संपर्क करावा. अधिक माहिती, मार्गदर्शन, प्रश्न, अडचणीसाठी शेतकरी बांधवांनी नजीकचे कृषि कार्यालयांशी संपर्क करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी माळशिरस यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng