शहरवासियांनो सावधान; भाजपकडून पुन्हा नव्या जुमल्यांना सुरुवात
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपकडून नवे ‘गाजर’, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांची टीका
पिंपरी (बारामती झटका)
निवडणुकीच्या तोंडावर नव-नवे जुमले घोषित करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहर भाजपाने आता नवे गाजर दाखविण्यास सुरुवात केली आहे. कॅनबे चौक ते निगडी हा तळवडे, चाकण एमआयडीसीला जोडणारा रस्ता हा त्याचाच एक भाग असून, गतवेळी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण न करणाऱ्या भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी आता हे नवे गाजर दाखविले आहे. त्यामुळे शहरवासियांनी सावध व्हावे आणि भाजपच्या जुमल्यांना बळी पडू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केले आहे.
रविकांत वरपे यांनी याबाबत एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून, त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक कधीही घोषित होऊ शकते. त्यामुळे ‘अॅक्टीव्ह मोड’मध्ये आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षांपासून ते इच्छुक कार्यकर्त्यापर्यंत सर्वजणच जनतेला भूलथापा मारून महापालिकेची सत्ता पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहेत. गतवेळी झालेल्या महापालिका निवडणुकीतही भाजपच्या नेत्यांनी असाच प्रकार करून सत्ता मिळविली होती. निवडणुकीच्या काळात दिलेल्या शेकडो आश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण करण्यात भाजपच्या सत्ताधार्यांना यश आले नाही. स्वस्वार्थ आणि ठेकेदारी यापेक्षा या सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत कोणतेही काम केले नाही. जनतेने भाजपचा खोटारडेपणा ओळखल्याने यावेळी सत्ता येणारच नाही, याची जाणिव झाल्याने भाजपाने केलेली कामे सांगण्याऐवजी नवे ‘जुमले’ घोषित करण्यात सुरुवात केली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे या पक्षाच्या शहराध्यक्षांनीच जनतेला फसविण्यास सुरुवात केल्याचे त्यांच्या फेसबुकवरील पोस्टमुळे समोर आले आहे. सध्या निगडी ते तळवडे, चाकण या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कठीण बनला आहे. गेल्या पाच वर्षांत यावर एकही उपाय न शोधणाऱ्या भाजपच्या शहराध्यक्षांनी कॅनबे चौक, तळवडे ते भक्ती शक्तीचौक असा रस्ता करण्यात येणार असल्याची तसेच महापालिका आयुक्तांनी त्यावर कार्यवाही सुरू केल्याचे आपल्याच फेसबुकवर जाहीर करून जनतेला ‘उल्लू’ बनविण्याचा प्रयत्न केला आहे.
जो रस्ता महापालिका आयुक्तांच्या हद्दीबाहेरून जातो, त्याबाबत आयुक्त निर्णय घेऊच शकत नाही, याची जाणिव असतानाही केवळ जनतेला फसविण्यासाठी आणि निवडणुकीत मते घेण्यासाठी त्यांनी सुरू केलेला प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. आयुक्त ज्या कॅनबे चौक ते निगडी रस्त्यावर काम सुरू करणार आहे, तो रस्ता देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतून जातो. रेडझोनमधून हा रस्ता जाणार असल्याचे दर्शविण्यात आले. त्यावर केवळ संरक्षण मंत्रालय निर्णय घेऊ शकते ही वस्तुस्थिती आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला देशाच्या संरक्षणा संदर्भातील साहित्य, दारुगोळा व इतर अत्यंत स्फोटक वस्तू साठविल्या जातात. त्यामुळे देशाच्या संरक्षणाला देखील धोका पोहोचू शकतो, याची जाणिव असतानाही जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या उद्देशाने त्यांनी सुरू केलेल्या उद्योगाला जनतेने आता फसू नये, असे आवाहनही रविकांत वरपे यांनी केले आहे.
रेडझोनच्या प्रश्नाचे काय ?
महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत रेडझोनचा प्रश्न सोडविण्याचे गाजर दाखविणार्या आमदार महेश लांडगे यांनी आतापर्यंत हा प्रश्न का सोडविला नाही? याचे उत्तर जनतेला पहिल्यांदा द्यावे. व्हिजन 20-20 देखील फसवेच निघाले आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आता फसव्या घोषणा करून जनता भुलथापांना बळी पडणार नसून येत्या महापालिका निवडणुकीत भाजपला जागा दाखवून देईल, असा विश्वासही रविकांत वरपे यांनी व्यक्त केला.
फेसबुकवरील प्रतिक्रिया बोलक्या –
महेश लांडगे यांनी आपल्या स्वत:च्या फेसबुकवर रस्त्याबाबत घोषणा केली आहे. याच फेसबुकवर वाचकांनी अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चैतन्य साळवे यांनी संरक्षण मंत्रालय रस्त्याच्या रुंदीकरणाला जागा देत नाही हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे वेगळ्या घोषणा करण्याऐवजी चाकणपर्यंत रस्ता पहिल्यांदा सहा पदरी करा आणि सर्व्हिस रोडची निर्मिती करा, असे म्हटले आहे. धीरज लोणीकर या नेटकऱ्याने भोसरी ते चाकण रस्त्यावरील अतिक्रमणे अगोदर हटवून दाखवा असे म्हटले आहे; तर सचिन उत्तेकर यांनी रस्त्याचे नंतर बघू, आधी रेडझोनचा प्रश्न मार्गी लावा असे म्हटले आहे. त्यामुळे या नेटकऱ्यांनीच हा रस्ता होणार नसून, केवळ निवडणुकीची घोषणा आहे, हेच दाखवून दिले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
This article is a gem! The insights provided are very valuable. For additional information, check out: DISCOVER MORE. Looking forward to the discussion!