काय सांगताय…. एकाच मंडपात एकाच बोहल्यावर एका नवरदेवाने दोन जुळ्या बहिणींशी एकाच वेळी विवाह केला !!!
अकलूज (माळेवाडी) येथील प्रसिद्ध हॉटेल गलांडे येथे हा अनोखा विवाह सोहळा संपन्न
अकलूज (प्रतिनिधी)
सध्या मुलींच्या तुलनेत मुलांचा जन्मदर कमी झाल्यामुळे अनेक मुलांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत. एखाद्या मुलाला चांगले घर असेल, जमीनजुमला असेल, नोकरी असेल तरी सुद्धा लग्न जमविण्यासाठी अनेक खटपटी कराव्या लागतात.
परंतु माळशिरस तालुक्यातील अकलूज-वेळापूर रस्त्यावर असलेल्या नामांकित हॉटेल गलांडे मध्ये मात्र 2 डिसेंबर रोजी निसर्गरम्य वातावरणात एकाच मंडपात एका तरुणाने चक्क दोन जुळ्या बहिणीशी विवाह केल्याची आश्चर्यकारक घटना घडली. दरम्यान या अनोख्या विवाहाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
एकाच वेळी एकाच मंडपात एकाच नवरदेवाने दोन वधूंशी विवाह केल्याचे आजवर कधी पाहायला किंवा ऐकायला मिळाले नव्हते. विशेष म्हणजे, त्या दोन वधू जुळ्या बहिणी आहेत. या विवाहाची पत्रिका व त्या संदर्भातील फोटो सध्या सोशल मोडियावर व्हायरल होत आहेत. अकलूज-वेळापूर रस्त्यावरील अकलूज आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या हॉटेल गलांडे येथे मंगळवारी 2 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता हा अनोखा व अविस्मरणीय विवाह सोहळा अगदी थाटात पार पडला. वधू पिंकी आणि वर अतुल हे दोन्ही कुटुंब मुंबईतील आहेत. मुलगा अंधेरीचा तर मुलगी कांदिवली येथील आहेत. त्यांचे नातेवाईक माळशिरस तालुक्यातील आहेत.
या अनोख्या विवाहाची निमंत्रण पत्रिका देखील छापण्यात आली होती. त्याचे हळदी व विवाह समारंभाचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
एकीकडे अनेक मुलांना विवाहासाठी एक मुलगी मिळत नसताना या पठ्याने मात्र एकाच वेळी दोन मुलींबरोबर लग्न केल्यामुळे हा लग्न सोहळा माळशिरस तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng