Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

राजेंद्र गुंड यांना साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय युवा पत्रकाररत्न पुरस्कार जाहीर

माढा (बारामती झटका)

माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक तथा दैनिक पुण्यनगरीचे मानेगाव प्रतिनिधी राजेंद्रकुमार बाळू गुंड सर यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल अखिल भारतीय साहित्य परिषदेच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘युवा पत्रकाररत्न पुरस्कार – 2022’ जाहीर झाला आहे.

सन 2015 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात दैनिक माणदेशनगरी या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर मे 2018 पासून दैनिक पुण्यनगरीमध्ये ते यशस्वीपणे आजतागायत कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कृषी, क्रिडा, राजकीय, आरोग्य आदी क्षेत्रातील प्रश्न व समस्यांवर प्रभावी व वस्तुनिष्ठपणे लेखन केले आहे. त्यांच्या बातम्यांची दखल घेऊन अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. या बाबींची दखल घेऊन त्यांना समारंभपूर्वक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पत्रकार राजेंद्रकुमार गुंड यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महात्मा गांधी साक्षरता मिशन बीड यांच्यावतीने दिला जाणारा ‘ज्ञानमिञ’ हा पुरस्कार 2 वेळा मिळाला. डाॅ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा “महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार” मिळाला आहे. माढा रोटरी क्लबच्या वतीने दिला जाणारा “राष्ट्राचे शिल्पकार” पुरस्कार मिळाला आहे. गीतांजली कला महोत्सव अंबाजोगाई यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘उपक्रमशील कलाध्यापक पुरस्कार’ मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने सन 2018 ला “कृतीशील शिक्षक पुरस्कार” प्राप्त झाला आहे. विशेष बाब म्हणजे सन 1996 साली माढा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळालेला आहे. सन 2019 मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यापूर्वीही त्यांना ‘कर्मयोगी आमदार बबनरावजी शिंदे राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार’ प्राप्त झालेला आहे. अल्पावधीतच माढा तालुक्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख व नावलौकिक निर्माण झाला आहे.

हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button