मुख्यमंत्र्यांनी मोळी टाकली, पण अजून उसाचे गाळप नाही !!!
तालुक्यातील पुढाऱ्यांची नौटंकी कधी थांबणार, ऊस उत्पादकांचा सवाल…
कार्यक्रमातून राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न मात्र, कारखाना चालू करण्याची जबाबदारी कोण घेणार ?
करमाळा (बारामती झटका)
गाजावाजा करत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा मोळी टाकण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. पण आठ दिवस उलटून गेले तरी उसाचे गाळप सुरू न झाल्यामुळे ऊस उत्पादकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात बचाव समितीला डावल्यामुळे खऱ्या अर्थाने आदिनाथ कारखाना सहकारी तत्त्वावर होऊन चालू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे सर्व कार्यकर्ते बाजूला थांबल्यामुळे कारखाना चालू करण्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रोच्या तावडीतून सोडून घेण्यासाठी बचाव समितीने सर्वप्रथम यल्गार पुकारला होता. समितीच्या सदस्यांनी लाखो रुपयाची आर्थिक मदत केली होती. मात्र, या बचाव समितीच्या सर्व सदस्यांना मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला टाळले, असा आरोप बचाव समितीचे निमंत्रक डॉ. वसंत पुंडे यांनी केला आहे.

दुसऱ्या बाजूने व्यासपीठावरून वावरताना माजी आमदार नारायण पाटीलच हिरो ठरल्याचे बागल गटाचे निदर्शनास आल्यामुळे बागल गटातही नाराजीचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी जवळपास दहा कोटी रुपयांची मदत आदिनाथ कारखान्याला केली. शिवाय शासकीय पातळीवरील सर्व कामकाजात मोलाची मदत केली. मात्र, शिंदे व सावंत या जोडीचा एकही फोटो कोणत्याही आदिनाथ कारखान्याच्या कार्यालयात न लावल्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी नाराज आहेत.
एकंदरीत आदिनाथच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न दोन्ही गटाकडून झाला, असा आरोप ऊस उत्पादकातून होत आहे. व्यासपीठावर सुद्धा डिजिटल बोर्ड लावताना त्यावर स्व. दिगंबर बागल यांचा फोटो नसल्यामुळे खुद्द रश्मी बागल नाराज झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात निवडून आलेल्या सरपंचाचा सत्कार करून बागल गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न नारायण पाटील यांनी केल्याचीही चर्चा तालुक्यात सुरू आहे. मात्र, सत्कार केलेल्या सरपंचांपैकी पाच सरपंच आपल्या गटाचे आहेत, असा दावा भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केला आहे. मुख्यमंत्री यांनी सत्कार केलेल्या सरपंचापैकी बऱ्याच सरपंचांनी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार शामलताई बागल यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार स्वीकारले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झालेले सरपंच नेमके कोणाचे, हासुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित विरोधकांनी करून आदिनाथ कारखान्याच्या कार्यक्रमात सरपंचाचा सत्कार कशासाठी, असा प्रश्न समितीचे निमंत्रक प्राध्यापक रामदास जवळ यांनी केला आहे.
एकंदरीत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी जमलेली हजारो लोकांची उपस्थिती जनसमुदाय हा आपल्याला समर्थन करणारा आहे, असे समजून मूर्खाच्या नंदनवनात वावरणारे नेतेमंडळी मात्र, आदिनाथ कारखाना प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी हात बगलेत घालून बाजूला उभे आहेत.
करमाळा तालुक्यातील जनतेचा अभिमान व सहकाराचे मंदिर पुन्हा चार वर्षांनी सुरू होत आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असलेली लोकप्रियता व तानाजी सावंत यांनी केलेल्या मदतीची उतराई करण्यासाठी या कार्यक्रमाला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. आणि या प्रत्येकाची इच्छा अशी होती. कारखाना तात्काळ सुरू होऊन आपल्या भाषणातून कारखान्याचे चेअरमन उसाचा दर जाहीर करतील व पेमेंट किती दिवसात देणार हे जाहीर करतील. यापैकी कोणतेही काम कारखान्याचे चेअरमन किंवा आमदार नारायण पाटील किंवा रश्मी बागल यांनी केले नाही.
‘तुम लढो, हम कपडे संभालते है’ अशा भूमिकेमुळे बारामती ॲग्रोच्या तावडीतून सुटलेला आदिनाथ कारखाना कोण सक्षमपणे चालवणार हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे
आदिनाथ चे गाळप कधी सुरू होणार ? आदिनाथ कारखाना ऊसाला किती रुपये भाव देणार ? किती दिवसात उसाचे पैसे देणार ?, सभासदांच्या या ३ प्रश्नांचे उत्तर माजी आमदार नारायण पाटील, आदिनाथच्या संचालिका रश्मी बागल व चेअरमन धनंजय डोंगरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन द्यावीत, अशी मागणी सभासदातून होत आहे.
या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी दिली असती तर मी कारखान्याच्या अडीअडचणी व पुढे काय करायचे यावर भाष्य करून त्या दिशेने मुख्यमंत्री महोदय व आरोग्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली असती. मात्र, कार्यक्रम आदिनाथ कारखान्याचा न होता राजकीय झाल्यामुळे कारखान्याचे मुळ विषय बाजूला राहिले. लवकरच बचाव समितीची बैठक घेऊन पुढील भूमिका जाहीर करू असे आदिनाथ कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng