पाणंद रस्त्यांची कामे महिनाभरात सुरू करण्यासाठी अचूक नियोजन करण्याचे सीईओ दिलीप स्वामी यांचे आदेश
येत्या दोन दिवसात तालुका स्तरावर बैठका
सोलापूर (बारामती झटका)
मातोश्री शेत रस्ता योजनेच्या (पाणंद रस्ते) कामांना गती देण्यासाठी येत्या दोन दिवसांपासून प्रत्येक तालुका स्तरावर बैठका घ्याव्यात, कामे राबविण्यात येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर कराव्यात, कोणत्याही स्थितीत येत्या महिनाभरात शेत रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी अचूक नियोजन करावे, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
मंगळवारी, जिल्हाधिकारी कार्यालयात मातोश्री शेतरस्ता योजनेला गती देण्याच्या पार्श्वभूमीवर सीईओ स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांच्यासह जिल्हा परिषद व बांधकाम विभागाचे उपअभियंता उपस्थित होते.
जिल्ह्यात ५३८ शेतरस्त्यांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात एकही काम सुरू होऊ शकलेले नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या योजनेला गती देण्याचे आदेश दिले आहेत. पाणंद रस्त्याची कामे राबवणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अशा तीन यंत्रणा आहेत. पण ग्रामसभेकडून कोणती यंत्रणा सुचविण्यात आली आहे, त्यानुसार कामे राबविण्यात यावीत. २४ लाखापेक्षा अधिक रकमेची कामे मंजुरीसाठी शासनाकडे पाठवली आहेत. या योजनेतील शेत रस्त्यांच्या कामांना तातडीने गती देण्यासाठी तालुकास्तरावर बैठका घेण्याचे आदेश सीईओ स्वामी यांनी दिले आहे.
प्रगती अहवाल घेऊनच या बैठकीला
मातोश्री शेत रस्त्यांच्या कामांना गती देऊन मंजूर असलेली कामे मार्च एंडपूर्वी पूर्ण करण्यासाठीचे नियोजन करावे, याविषयी पुढील आठ दिवसांत पुन्हा बैठक घेण्यात येईल. आठ दिवसात कामांना गती देण्यासाठी काय प्रगती केली, याचा अहवाल घेऊनच बैठकीला येण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng