जमीन वाटून देत नाही म्हणून मुलांनीच लोखंडी हातोड्याने मोडले पित्याचे दोन्ही पाय
चांदापुरी (बारामती झटका) रशिद शेख यांजकडून
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील जेष्ठ नागरिक शशिकांत किसन सातपुते यांना त्यांची दोन मुले, पत्नी व दोन सुना अशा ५ व्यक्तींनी मिळून जमीन वाटून देण्यासाठी वारंवार मागणी करूनही टाळाटाळ करीत असल्याचे कारण पुढे करून शशिकांत सातपुते यांना वरील संशयित पाच व्यक्तींनी लोखंडी हातोड्याने दोन्ही पाय मोडून जबर जखमी करून जीव मारण्याचा प्रयत्न केला आहे. जखमी शशिकांत किसन सातपुते यांच्या रुग्णालयातील रेकॉर्डिंग फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर शशिकांत सातपुते, संगम शशिकांत सातपुते पत्नी व दोन सुना यांच्या विरोधात शशिकांत सातपुते यांच्या फिर्यादीनुसार ५ जणांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्या संशयित पाच व्यक्तींविरोधात माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यापैकी पिलीव पोलीस दूर क्षेत्रातील हवालदार अभिजीत कणसे, पंडीत मिसाळ, अमित जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांनी ज्ञानेश्वर सातपुते व संगम सातपुते यांना ताब्यात घेतले असून इतर संशयित आरोपींचा शोध पोलीस निरीक्षक दीपकरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके हे पिलीव पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.
शशिकांत किसन सातपुते व त्यांच्या पहिल्या पत्नीची दोन मुले व सुना या वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून शशिकांत किसन सातपुते हा त्याची दुसरी पत्नी व त्यांच्या मुलासह या वरील संशयित आरोपीपासून वेगळा व लांब राहत आहे. शशिकांत सातपुते हा त्याच्या राहत्या घरी एकटा असल्याची संधी साधून वरील संशयित आरोपींनी लोखंडी हातोड्याने मारून गंभीर जखमी करून दोन्ही पाय मोडले असून त्याला गंभीर अवस्थेत पोलीस स्टेशनला दाखल केले असता त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे औषध उपचारासाठी पाठवले होते. परंतु, शशिकांत सातपुते हे गंभीर जखमी असल्याने त्याला अकलूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शशिकांत सातपुते यांनी खाजगी दवाखान्यातूनच माळशिरस पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून संशयित पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याप्रमाणे माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके हे पुढील तपास करीत असून ज्ञानेश्वर सातपुते व संगम सातपुते यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng