आता उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करावे – महेश चिवटे
करमाळा (बारामती झटका)
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेल्या शिवसेनेचे नाव व पक्ष चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या गटाला मिळाले असून आता महाराष्ट्रात पूर्ण शिवसेना एक मुखी करण्यासाठी उद्धव
ठाकरे यांनी शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.
आज धनुष्यबाण शिवसेना नाव मिळाल्यानंतर करमाळा येथील शिवसैनिकांनी फटाक्याच्या आतीशबाजीत व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी तालुकाप्रमुख देवानंद बागल, शहर प्रमुख नागेश गुरव, सेनेचे निखिल चांदगुडे, विशाल गायकवाड, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियंकाताई गायकवाड, पै. दादा इंदुलकर, शिवसेना वैद्यकीय पक्ष सहप्रमुख शिवकुमार चिवटे, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, शेंडगे, रोहित वायबसे आदी उपस्थित होते.

या जल्लोषानंतर झालेल्या सभेत बोलताना महेश चिवटे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी स्वर्गातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आशीर्वाद दिला आहे. खऱ्या अर्थाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला शांती लागत असेल. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शरद पवाराच्या दावणीला बांधून सर्व शिवसैनिकांना राष्ट्रवादीचे लाचार कार्यकर्ते होण्याची वेळ आणली होती. मात्र, स्वाभिमानी एकनाथ शिंदे यांनी उठाव करून राष्ट्रवादी काँग्रेसची या माध्यमातून जिरवली आहे. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करून तमाम शिवसैनिकांच्या हितासाठी व हिंदूंच्या हितासाठी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून आगामी काळात राजकारण, समाजकारण करावे असे आवाहन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng