करमाळा नगरपालिका प्रशासकीय इमारत व टाऊन हॉलची इमारत २०२५ पर्यंत पूर्ण होणार – महेश चिवटे
करमाळा (बारामती झटका)
करमाळा नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चबुतरा बांधण्यासाठी संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी वर्ग केला असून लवकरच ही कामे पूर्ण होतील, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीच्या काळात आ. संजयमामा शिंदे यांनी ही कामे मंजूर करून घेतली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर या सर्व कामांना स्थगिती देण्यात आली होती. आ. संजयमामा शिंदे यांनी स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न केले होते. जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी स्थगिती उठवून या कामाला तात्काळ निधी मिळवून देण्याची मागणी केली होती.
यानंतर या कामाच्या डिझाईन करण्याचे काम निरगुडेकर या आर्किटेक्चरला देण्यात आले होते. या कामाच्या आता डिझाईन पूर्ण झाले असून या डिझाईनची पाहणी जिल्हाप्रमुख महेश चिवटे, मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी केली. या कामामुळे करमाळ्याच्या नावलौकिकात भर पडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा करमाळ्यात हवा, ही मागणी महेश चिवटे यांनी केली होती. याबाबत खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सकारात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळासुद्धा प्रमाणात लवकरच साकारला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल करमाळ्यातील शिवप्रेमींच्यावतीने अरुणकाका जगताप यांच्या नेतृत्वाखाली वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng