मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभहस्ते महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान संपन्न झाला.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची उपस्थिती होती.
मुंबई ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. सदरच्या कार्यक्रमास भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची उपस्थिती होती.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रशासनातील विशेष करून पोलीस विभागातील महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला होता. गृहप्रपंच सांभाळत प्रशासनामध्ये काटेकोरपणे व यशस्वी कार्यभार सांभाळणाऱ्या रणरागिनींचा सन्मान सोहळा होता. महिलांना अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यामध्ये पत्नी, आई, बहिण, मुलगी अशा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये दिवसेंदिवस महिलांचे सबलीकरण होत आहे. सर्वच क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहेत. अशा महिलांचा सन्मान करणे, आपल्या देशाची हिंदू संस्कृती आहे. या संस्कृतीप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सन्मान सोहळा आयोजित करून महिलांशी हितगुज व सुसंवाद साधलेला आहे.

लोकप्रतिनिधी यांच्याकडून झालेला सन्मान महिलांना भविष्यामध्ये काम करण्याकरता प्रेरणादायी ठरणार असल्याने सर्व महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
८ मार्च जागतिक महिला दिन
अमेरिका आणि युरोप सहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात ‘द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु ही असोसिएशन सुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरिता विषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने “सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे” अशी घोषणा केली.

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्क मध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्या बरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.

यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंड मध्ये नि १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया बोलत्या व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती नुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा, स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता सर्व ठिकाणी ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे.
जागतिक महिला दिनाच्या बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल च्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng