शेरी नं. १ शाळेत जागतिक महिला दिन जल्लोषात साजरा
वेळापूर (बारामती झटका)
आकर्षक मंडपाने आच्छादलेले शाळेचे प्रांगण… महिलांची अलोट गर्दी… एकाहून एक मनोरंजक खेळांनी व स्पर्धांनी वाढत गेलेली रंगत, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शेरी नं. १ जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिन साजरा झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वेळापूर बीटच्या विस्तार अधिकारी सायरा मुलाणी, ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे, पत्रकार व नूतन संचालक अशोक पवार सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमलाकर माने देशमुख, सचिन पवार, हिम्मतराव माने देशमुख, रणजित माने देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक चाँदसाहेब नदाफ यांनी केले. त्यानंतर महिलांचे आरोग्य या विषयावर डॉ. शुभांगी उदयसिंह माने देशमुख व डॉ. केतकी जयराज माने देशमुख यांची व्याख्याने संपन्न झाली. यावेळी प्राजक्ता विराज माने देशमुख यांचेही समयोचित भाषण झाले. विस्तार अधिकारी सायरा मुलाणी यांनी उपस्थित महिलांना स्वत:साठी वेळ देण्याचे भावपूर्ण आवाहन केले. प्रमुख अतिथी सूर्यकांत भिसे यांनी महिलांना संस्कारांना अध्यात्माची जोड देऊन उद्याची सामर्थ्यशाली पिढी घडवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
शाळेतील विज्ञान शिक्षक पांडुरंग वाघ सर यांनी शाळेने विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा आलेख मांडला. त्यानंतर महिलांच्या संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात, बादलीत चेंडू टाकणे, सूचनेनुसार कृती करणे व उखाण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी महिलांनी उत्स्फुर्तपणे समूहगीतांचे गायन केले. सखी-सहेली या महिलांच्या समूहाची यावेळी स्थापना झाली व त्यांनी केक कापून जल्लोष केला. मनोरंजक खेळातील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीसे देण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ पद्धतीने एका महिलेची निवड करून त्यांना पैठणी देण्यात आली. शाळेच्या पालक सुलोचना गणेश पवार यांना पैठणीचा मान मिळाला. यावेळी माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्द्ल अशोक पवार सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी देणगी दिल्याबद्द्ल शकील शेख, हिम्मतराव माने देशमुख, कल्याणराव माने देशमुख, कमलाकर माने देशमुख, विराज माने देशमुख, विराज घार्गे, सखी-सहेली ग्रुप यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वांना कु. प्रेरणा कमलाकर माने देशमुख हीच्याकडून वाढदिवसानिमित्त अल्पोपहार देण्यात आला.
या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रेमनाथ रामदासी यांनी केले तर प्रदीप कोरेकर यांनी आभार मानले. यावेळी प्रियंका साठे, शितल खुडे, सुलोचना थोरात, अश्विनी थोरात यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng