अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती भाजप बुद्रुक समावेश तर शिवसेना वंचित राहणार का ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माळशिरस तालुक्यातील शिवसेनेला पक्ष वाढविण्यासाठी बळकटी मिळणार का ?
माळशिरस ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटाकडून भाजपच्या बुद्रुक गटाला समावेश करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वंचित राहणार का ? असा माळशिरस तालुक्यातील शिवसेनेच्या गोटातून चर्चिला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माळशिरस तालुक्यातील शिवसेनेला पक्ष वाढविण्यासाठी बळकटी मिळणार का ? असाही सवाल राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यापासून मोठ्या प्रमाणात आमदार शिवसेनेतून बाहेर काढण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले होते. भाजपसोबत हात मिळवणी करून महाराष्ट्रात भाजप व शिंदे गट असे सरकार बनलेले आहे. शिवसेना पक्ष व चिन्ह न्यायालयाकडून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्रामध्ये शिंदे गटाची शिवसेना अस्तित्वात आलेली आहे. आरोग्य मंत्री नामदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात प्राध्यापक शिवाजीराव सावंत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देऊन राजाभाऊ हिवरकर पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेना माळशिरस तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर असताना पक्ष वाढीसाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना ताकद देणे गरजेचे आहे. असे असताना सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या समवेत असणाऱ्या भाजपच्या बुद्रुक व खुर्द गटाला संधी दिलेली आहे. त्या वेळेला शिवसेना वंचित राहिलेली आहे. सध्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू आहे. पहिल्यांदाच सत्ताधारी मोहिते पाटील गट भाजपमध्ये आल्यानंतर निवडणूक लागली आहे. त्यामध्ये सत्ताधारी भाजपच्या मोहिते पाटील गटाकडून बुद्रुक भाजपला संधी देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांची शिवसेना वंचित राहणार का ?, असे जर झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माळशिरस तालुक्यातील शिवसेनेला पक्ष वाढीसाठी बळकटी मिळणार का ?, असाही सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री पदावर असताना पक्ष वाढीसाठी जर प्रयत्न होत नसतील तर भविष्यात झेंडे जाऊन फक्त दांडे राहतील, असाही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत व सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या भूमिकेकडे माळशिरस तालुक्यातील शिवसेनेचे लक्ष लागून राहिलेले आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेला स्थान न दिल्यास माळशिरस तालुका अध्यक्ष राजाभाऊ हिवरकर पाटील काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng