Uncategorized

शिवरत्नवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचार शुभारंभाकडे बुद्रुक भाजपने पाठ फिरवली…

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप बुद्रुक व भाजप खुर्द यांच्यामधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत…

माळशिरस ( बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. माघारी घेण्याचे काही दिवस असताना सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या प्रचाराचा शुभारंभ शिवरत्न बंगला येथे संपन्न झाला‌ सदरच्या प्रचाराच्या शुभारंभाला माळशिरस तालुक्यातील भाजप बुद्रुक गटाने पाठ फिरवली आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप बुद्रुक व भाजप खुर्द यांच्यामधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आलेले असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे.

माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधक असे दोन पारंपारिक राजकीय गट आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील परिवारातील सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. तालुक्यातील मोहिते पाटील व विरोधी गटातील काही नेते व कार्यकर्ते यांनी भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करून मतदान केलेले होते. विधानसभेच्या वेळी विरोधी गटातील मूळ भाजपचा बुद्रुक गट राम सातपुते यांच्यासोबत राहिलेला होता. जरी मोहिते पाटील भाजपमध्ये आलेले असले तरीसुद्धा भाजप बुद्रुक गटाने आपले स्वतःचे अस्तित्व कायम राखलेले आहे.

मोहिते पाटील गट भाजपमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. त्यामध्ये भाजप बुद्रुक गटाला समाविष्ट करतील अशी चर्चा, राजकीय वर्तुळामध्ये सुरू असताना पूर्वी मोहिते पाटील यांच्या विचाराचे असणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी दिलेली होती. त्यामुळे बुद्रुक भाजपमधील सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व सोलापूर जिल्हा भाजपचे सहभागी के. के. पाटील यांनी काँग्रेसचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांच्या समवेत उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. सत्ताधारी मोहिते पाटील गटाचा शिवरत्न बंगला येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, आ‌. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळेस भाजप बुद्रुकमधील नेते व कार्यकर्ते यांनी पाठ फिरवलेली आहे.

माळशिरस तालुक्यात भाजपचे निष्ठावान म्हणून ज्येष्ठ नेते ॲड. सुभाषअण्णा पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ज्येष्ठ नेत्या संजीवनीताई पाटील, भाजपचे प्रांतिक सदस्य व सोलापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष राजकुमार पाटील, भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हनुमंतराव सूळ, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, उद्योजक दत्तात्रय शेळके, माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, भाजपा तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण उर्फ पिनू माने, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, त्यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते भाजप बुद्रुकमध्ये आहेत. अनेकांना मोहिते पाटील परिवारातील सदस्य यांनी स्वतः हस्ते परहस्ते, फोनद्वारे संपर्क केलेला होता. तरीसुद्धा बुद्रुक भाजपने प्रचाराच्या शुभारंभाकडे पाठ फिरवलेली असल्याने अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आलेले आहेत.

माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागामध्ये राजकुमार पाटील यांच्या विचाराचा कायम एक गट अस्तित्वात आहे. सकारात्मक राजकारण करीत असल्याने राजकुमार पाटील यांच्या विचारावर राजकारण करणारे पूर्व भागामध्ये अनेक नेते व कार्यकर्ते आहेत. राजकुमार पाटील प्रचार शुभारंभाला उपस्थित नसल्याने माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागाला मोहिते पाटील गटाला मोठा फटका बसणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button