सोळा लाखाच्या फायद्यासाठी नगरपालिकेच्या एक कोटी रुपयांच्या रस्त्याचे नुकसान
मुख्याधिकारी बालाजी लोंढे संशयाच्या फेऱ्यात
करमाळा (बारामती झटका)
जिओ कंपनीची करमाळा शहरातून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे करमाळा शहरातील जवळपास एक कोटी रुपये किमतीचे रस्त्याचे नुकसान होत आहे मात्र, मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी केवळ १६ लाख रुपये नुकसान भरपाई घेऊन या कंपनीला रस्ते होण्यास मान्यता दिली आहे. याबाबत उलटसुलट चर्चा असून याच कामासाठी पाच वर्षांपूर्वी एअरटेल आयडिया कंपनीकडून करमाळा नगरपालिकेने ६० लाख रुपये नुकसान भरपाई घेतली होती. आता मात्र केवळ १६ लाखातच ही परवानगी दिली. शिवाय संबंधित कंपनीने सर्व नियम धाब्यावर बसून जेसीबीसारख्या यंत्राने रस्ते उघडण्याचे काम शहरातून सुरू केले आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी शहरप्रमुख चंद्रकांत राखुंडे यांनी केली आहे.
यावेळी चंद्रकांत राखुंडे म्हणाले की, हे काम करताना कोणताही रस्ता न होता अंडरग्राउंड आधुनिक मशीनद्वारे केबल टाकण्यास परवानगी दिलेली आहे, जेणेकरून रस्त्याचे नुकसान होणार नाही. जेथे खड्डा खांदायचा आहे त्या ठिकाणी तेवढाच खड्डा खांदावा, असे आदेश आहेत. पण हे सर्व नियम धाब्यावर बसवून थेट जेसीबीच्या माध्यमातून करमाळा शहरातील कोट्यावधी रुपयांची रस्ते उखडण्याचे काम सुरू झाले आहे.
सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते, डांबरीकरण केलेले पक्के रस्ते, बांधलेले पूल, धडाधड जेसीबीने उघडले जात आहेत. केवळ १६ लाख रुपयांच्या फायद्यासाठी करमाळा शहर उद्ध्वस्त करण्याचे काम मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी केले आहेत.
अशा पद्धतीने महात्मा गांधी विद्यालयाच्या पाठीमागे रस्ता जीसीबीने खोदत असताना त्यातील माजी नगरसेवक नितीन घोलप यांनी विरोध केल्यानंतर या ठिकाणी अत्याधुनिक मशीनद्वारे खड्डा खणताना जमिनीखालून केबल टाकण्यात आली. या सर्व ठिकाणचे चंद्रकांत राखुंडे यांनी फोटो काढले असून नगरपालिकेच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान केले याप्रकरणी मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
सर्व पुराव्यानिशी करमाळा पोलीस ठाण्यात पालिका मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. कलम १३८ नुसार नगरपालिकेच्या नुकसानास जबाबदार लोंढे यांच्यावर निश्चित करून त्यांच्या पगारातून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणीही चंद्रकांत राखुंडे यांनी केली आहे. बालाजी लोंढे यांच्या काळात करमाळा शहरात जेवढी रस्ता दुरुस्ती व इतर कामे झाले, त्याचीही माहितीच्या अधिकारात मागणी केली असल्याची माहिती राखुंडे यांनी दिली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng