पंढरपूरचा अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर फरार झाला असून सांगली पोलिसांची पथके शोध कार्यासाठी रवाना
अन्न व औषध प्रशासनाचा अधिकारी गुटखा माफिया सिद्ध झाल्यामुळे राज्यात खळबळ
पंढरपूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषदेत अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून नेमणूक असलेला आणि पंढरपूर शहराचा अन्नसुरक्षा अधिकारी पोलीस निरीक्षक प्रशांत कुचेकर सध्या फरार असून त्याच्यावर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुटखा तस्करीचा गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल १ कोटी १७ लाख रुपयांचा गुटखा पोलिसांना सापडला असून हा गुटखा त्याच्या मालकीचा असल्याचे इतरांनी जबाबात सांगितले आहे. अन्न व औषध प्रशासनाचा अधिकारीच गुटखा माफिया सिद्ध झाल्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
सांगली जिल्ह्यात ३ मे रोजी राज्यातील नागरिकांना चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. गुटखा आणि सुगंधित सुपारीने भरलेले २ कंटेनर रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ पोलिसांच्या हाती लागले. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे आणि सांगली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सापळा रचून हे कंटेनर पकडले. या प्रकरणी कंटेनरसोबत असणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच, तिघांचीही तोंडे उघडली. हा गुटका अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत शशिकांत कुचेकर यांच्या मालकीचा असल्याचे तिघांनीही कबूल केले आणि पोलिसांनाही मोठा धक्का बसला. या प्रकरणाची चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात रंगू लागली. पोलीस निरीक्षक प्रशांत कुचेकर यांच्या नित्य वर्तनावरही संशय व्यक्त होऊ लागला. त्यांचे फोन न उचलणे, तक्रारदारासाठी कधीही उपलब्ध न होणे, याशिवाय त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या मोहिमांंबद्दल संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. या घटनेतील प्रमुख आरोपी पंढरपूर तीर्थक्षेत्र नगरीचा अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर हा फरार असून सांगली पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. त्याच्या शोधकार्यासाठी दोन पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना झाली असून लवकरच तो हाती लागेल, अशी माहिती कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली आहे.
प्रशांत कुचेकर हा अन्न सुरक्षा विभागातील अस्खनीतील निखारा आहे. या निखाऱ्याला फुलविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, व खाजगी मदत कोठून मिळत होती, याची चौकशी करणे गरजेचे आहे. कारण यातून आणखी नवनवीन गोष्टी समोर येणार असून या गोष्टींना कोण पुष्टी देत होते हे समोर येणार आहे.
आणखी घबाड हाती लागणार…
पंढरपूरचा अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर गुटखा माफिया म्हणून किती दिवसांपासून कार्यरत होता ? गुटख्याच्या तस्करीतून त्याने आतापर्यंत किती संपत्ती कमावली आहे ? अन्न व औषध प्रशासनातील आणखी काही अधिकारी त्याच्या या कृत्यात सामील आहेत काय ?, हे पोलीस तपासात उघड होणार आहे. यामुळे याप्रकरणी पोलिसांच्या तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
संपूर्ण राज्याच संकटात…
प्रशासनातील एक जबाबदार अधिकारी ज्याच्यावर तस्करी रोखण्याची जबाबदारी आहे, तोच जर तस्करी करू लागला तर, काय होऊ शकते, हे या प्रकरणातून पुढे येणार आहे. प्रशासनातील अधिकाऱ्याच्या या कृत्यामुळे संपूर्ण राज्यच संकटात असून राज्याचे भविष्य सुरक्षित राहिले नसल्याचे चित्र दिसू लागले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng